विश्रांतवाडी : लोहगावचे माजी उपसरपंच प्रीतम प्रतापराव खांदवे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार बापूसाहेब पठारे यांना जाहीर पाठिंबा दिला. खांदवे-पाटील यांनी पठारे यांना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट देऊन आपले समर्थन व्यक्त केले. पठारे यांना दिवसेंदिवस पाठिंबा वाढत असून प्रीतम खांदवे यांचा पाठिंबा मिळाल्याने महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या पाठिंब्यामुळे लोहगाव परिसर व वडगावशेरी मतदारसंघात आघाडीला अधिक बळकटी मिळाली असल्याचे मत स्थानिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. विधानसभा निवडणुकीत जनतेच्या व्यापक समर्थनाने विजय संपादन करण्याचा आत्मविश्वास महाविकास आघाडीने व्यक्त केला आहे. “बापूसाहेब पठारे हे एक अनुभवी, कर्तव्यनिष्ठ आणि समाजाच्या हितासाठी कार्य करणारे नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली परिसरात अनेक विकासकामे झाली आहेत. त्यांच्या दूरदृष्टीने आगामी काळातही विकासकामे सुरूच राहतील अशी आम्हाला खात्री आहे, असे माजी उपसरपंच प्रीतम खांदवे म्हणाले.” लोहगावच्या जनतेच्या सेवेसाठी नेहमीच कार्यरत होतो. या पुढील काळातही त्यांच्या अपेक्षांवर खरे उतरण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे, असे या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना बापूसाहेब पठारे म्हणाले.