Nitin Gadkari : ‘रस्त्यावर थुंकणाऱ्यांचे फोटो वर्तमानपत्रात छापा’; नितीन गडकरींचे आवाहन

Nitin Gadkari – भारतात चाॅकलेट खाल्ले तर वेष्टन रस्त्यावर फेकणारे विदेशात मात्र वेष्टन खिशात ठेवतात असे सांगतानाच पान, तंबाखू व गुटखा खावून रस्त्यावर थुंकणाऱ्यांचे फोटो काढून वर्तमानपत्रांकडे पाठवा. आणि वर्तमानपत्रांनीही शहर घाण करणाऱ्यांचे फोटो छापावेत असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त नागपूर महानगरपालिकेद्वारे वारसास्थळ असलेल्या कस्तुरचंद पार्क येथे आयोजित स्वच्छ भारत अभियान कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर अभिजीत चौधरी, आतिरिक्त आयुक्त आँचल गोयल उपस्थित होते.
मला देखील चाॅकलेट खाल्ल्यावर गाडीतून वेष्टन रस्त्यावर फेकण्याची सवय होती. पण, नंतर ही सवय प्रयत्नपूर्वक बदलली. आता मी वेष्टन खिशात ठेवतो आणि घरी गेल्यावर डस्टबीनमध्ये टाकतो. नेते जगाला मार्गदर्शन करतात. पण व्यक्तिगत जीवनात अनुकरण करीत नाही. मी मात्र असे वागत नाही अशी उपरोधीक टीका गडकरींनी केली.
इकाॅलाॅजी, पर्यावरण चांगले असले तर दवाखान्यात जायची वेळ येत नाही. जल, वायू व ध्वनी प्रदुषणामुळे आयुष्य कमी करीत आहो. कचऱ्यातून संपत्ती निर्माण केली तर सर्व समस्या संपेल असे ते म्हणाले.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दिल्ली-मुंबई, ढोलेरा-अहमदाबाद तसेच इतर राष्ट्रीय महामार्गाच्या बांधणीमध्ये कचऱ्याचे विलगीकरण करून कंत्राटदारांना या कचरा सामग्रीचे रस्ते बांधणीत वापर करण्याचे सांगितले असून,
आतापर्यंत ८० लाख टन कचऱ्याचा वापर रस्ते बांधणीत करण्यात आला आहे. यामुळे पर्यायाने कचऱ्याची विल्हेवाट लागून स्वच्छता अभियानाला हातभार लागत असल्याचे गडकरींनी सांगितले.





