Prince William Visits Dharma Productions : प्रिन्स विल्यम यांनी अनुभवले बॉलिवूडचे आदरातिथ्य; करण जोहर यांच्या ‘धर्मा प्रॉडक्शन’ला दिली भेट
प्रिन्स ऑफ वेल्स यांच्याशी संवाद साधताना जोहर यांनी भारतीय चित्रपटांना असलेल्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेबद्दल, विशेषतः मध्य पूर्वेतील (मिडल ईस्ट) वाढत्या लोकप्रियतेबद्दल माहिती दिली.

Prince William Visits Dharma Productions – ब्रिटनचे प्रिन्स विल्यम यांनी बुधवारी मुंबईतील करण जोहर यांच्या धर्मा प्रॉडक्शनच्या कार्यालयाला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांना बॉलिवूडमधील गाणी, नृत्य आणि भारतीय सिनेसृष्टीच्या आदरतिथ्याची खास झलक अनुभवायला मिळाली.
ब्रिटिश राजगादीचे वारसदार असलेल्या प्रिन्स विल्यम यांनी अंधेरी येथील या प्रॉडक्शन हाऊसच्या कार्यालयात सुमारे ४५ मिनिटे व्यतीत केली. यावेळी करण जोहर, अभिनेता सैफ अली खान, अभिनेत्री करीना कपूर खान आणि कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अपूर्व मेहता यांनी त्यांचे स्वागत केले.
पारंपारिक वेशभूषेतील नृत्य पथकाने करण जोहर यांच्या २००१ मधील कभी खुशी कभी गम या चित्रपटातील से शावा शावा आणि बोले चुडियां या लोकप्रिय गाण्यांवर नृत्य सादर केले, तर पार्श्वभूमीवर या चित्रपटाचे शीर्षक गीत वाजवले जात होते. या कौटुंबिक चित्रपटातील अनेक दृश्ये आणि गाणी लंडनसह ब्रिटनच्या विविध भागांत चित्रित करण्यात आली होती.
या प्रसंगी पाहुण्यांसाठी विविध चविष्ट पदार्थांची मेजवानी ठेवण्यात आली होती, तसेच पुरस्कारांनी सजवलेल्या भिंतीसमोर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. करण जोहर हे कुछ कुछ होता है, कभी खुशी कभी गम, माय नेम इज खान आणि रॉकी और रानी की प्रेम कहानी यांसारख्या यशस्वी चित्रपटांसाठी ओळखले जातात.
प्रिन्स ऑफ वेल्स यांच्याशी संवाद साधताना जोहर यांनी भारतीय चित्रपटांना असलेल्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेबद्दल, विशेषतः मध्य पूर्वेतील (मिडल ईस्ट) वाढत्या लोकप्रियतेबद्दल माहिती दिली. प्रिन्स विल्यम आणि प्रिन्सेस कॅथरीन हे सध्या भारत दौऱ्यावर असून, त्यांचा हा दौरा तीन दिवसांचा आहे.






