PM Modi US Visit : पंतप्रधान अमेरिकेला जाणार, नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची भेट होणार

PM Modi US Visit : डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी घेतलेल्या निर्णयांची तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीची जोरदार चर्चा सुरु आहे. असं असताना आता हे दोन्ही बडे नेते १३ फेब्रुवारीला भेटू शकतात असे वृत्त समोर आलं आहे. पीएम मोदी या महिन्यात अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत.
पंतप्रधान मोदींचा फ्रान्स दौरा संपल्यानंतर ते १२ फेब्रुवारीला संध्याकाळी वॉशिंग्टनला येतील. तसेच १४ फेब्रुवारीपर्यंत अमेरिकेत राहणार असून अमेरिकन कॉर्पोरेट नेते आणि समुदायाला भेट देण्याची शक्यता आहे. नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात 27 जानेवारीला फोनवर संभाषण झाले होते. यावेळी या दोन्ही बड्या नेत्यांमध्ये मोदींच्या अमेरिका दौऱ्याबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे.
काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले कि, मी पंतप्रधान मोदींशी बराच वेळ फोनवरून संभाषण केले. पुढील महिन्यात ते व्हाईट हाऊसमध्ये येतील अशी आशा आहे. भारतासोबत आमचे चांगले संबंध आहेत. या प्रकरणाशी परिचित असलेल्या लोकांचा हवाला देऊन, अहवालात म्हटले आहे की ट्रम्प अमेरिकेची भारताबरोबरची व्यापार तूट कमी करण्याचा आणि या कालावधीत भारतातील अमेरिकन व्यावसायिक हितांसाठी अधिक आक्रमकपणे काम करण्याचा संकल्प करत आहेत.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याबाबत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, दोन्ही देशांमधील सर्वसमावेशक जागतिक धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी या भेटीचे नियोजन केले जात असल्याचं रणधीर जैस्वाल यांनी सांगितले आहे. तसेच नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या तारखेबाबतचा अंतिम निर्णय लवकरच घेतला जाणार असल्याचंदेखील त्यांनी यावेळी सांगितले.





