“पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत…” ; नितीश कुमारांच्या विधाननाने चर्चेला उधाण

Nitish Kumar। लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यासाठी प्रचारासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या नेते कामाला लागलेत. त्यात आपल्याच पक्षाचे जास्तीत जास्त खासदार कसे निवडून येतील यासाठी प्रयत्न करत आहेत. दरम्यान, बिहारमध्येही सातव्या टप्प्यातील निवडणुकीसाठी प्रचार सुरू आहे. याठिकाणी दनियावा लोकसभा मतदारसंघातील एका प्रचार सभेला संबोधित करताना बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एक विधान केले. त्याची सध्या जोरदार चर्चा रंगलीय.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत” Nitish Kumar।
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या सभेत बोलताना इंडिया आघाडी आणि लालू प्रसाद यादव यांच्यावर निशाणा साधला. यावेळी नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. मात्र, कौतुक करत असताना ते काही तरी वेगळंच बोलून गेले. “पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, हीच आमची इच्छा”, असं विधान नितीश कुमार यांनी केलं. मात्र, त्यानंतर आपली चूक लक्षात येताच त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी काही महिन्यांपूर्वी भाजपाबरोबरची युती तोडत राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) पक्षाबरोबर युती करत बिहारमध्ये सरकार स्थापन केलं होतं. मात्र, त्यानंतर पुन्हा काही महिन्यांनी राष्ट्रीय जनता दल पक्षाबरोबरची युती तोडत त्यांनी पुन्हा भाजपाबरोबर जात बिहारमध्ये सत्ता स्थापन केली. बिहारच्या राजकारणात मागील वर्षभरात अनेक घडामोडी घडल्या. आता लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा पक्ष एनडीएबरोबर आहे. त्यामुळे ते एनडीच्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत. अशाच एका सभेत बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या विधानाची चांगलीच चर्चा होत आहे.
मुख्यमंत्री नितीश कुमार काय म्हणाले? Nitish Kumar।
“बिहारमध्ये आम्ही सर्व ४० जागा आणि देशात ४०० जागा जिंकणार आहोत. त्यामुळे नरेंद्र मोदी पुन्हा मुख्यमंत्री होतील, म्हणजे देशाचा आणि बिहारचा विकास होईल. विरोधकांनी काहीही विकासकामे केली नाहीत. त्यांच्या काळात सांयकाळी लोक घाबरून घराबाहेर पडायचे नाहीत. त्यांना (आरजेडी) संधी मिळाली. मात्र, त्यांनी त्याचा काही उपयोग न करता काहीही कामे केली नाहीत”, अशी टीका नितीश कुमार यांनी लालू प्रसाद यादव यादव यांच्यावर नाव न घेता केली.





