पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्यात; मेट्रो मार्गाच्या विस्तार उद्घाटनासह नव्या मार्गाचे भूमिपूजन

पुणे – पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरूवारी (दि. २६ सप्टें.) पुणे दौऱ्यावर येणार आहेत. सायंकाळी सहा वाजता जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानक येथून स्वारगेटला जाणाऱ्या मेट्रो रेल्वेला झेंडा दाखवून ते या सेवेची सुरुवात करतील. त्यानंतर साडेसहा वाजता त्यांच्या हस्ते विविध प्रकल्पांची पायाभरणी तसेच लोकार्पण करण्यात येईल.
पुणे मेट्रो रेल्वेच्या जिल्हा न्यायालय ते स्वारगेट दरम्यान मेट्रो सेवेच्या उद्घाटनाने पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण होईल. जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या टप्प्यातील भूमिगत रेल्वे प्रकल्पाच्या कार्याला सुमारे एक हजार ८१० कोटी रुपये खर्च आला आहे.
यानंतर, सुमारे दोन हजार ९५० कोटी रुपये खर्चून विकसित केल्या जाणाऱ्या स्वारगेट-कात्रज या पुणे मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील विस्तार कार्याची पायाभरणी देखील पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.
पुण्यातील भिडेवाडा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्थापन केलेल्या पहिल्या कन्याशाळेच्या स्मरणार्थ उभारल्या जाणाऱ्या स्मारकाच्या कार्याची कोनशीला पंतप्रधानांच्या हस्ते ठेवण्यात येईल.
अन्य उद्घाटन कार्यक्रम
– तीन परम रुद्र महासंगणकांचे लोकार्पण करण्यात येईल.
– पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू क्षेत्रातील १० हजार ४०० कोटी रुपये खर्चाच्या विविध उपक्रमांचे उदघाटन आणि लोकार्पण करतील.
– वाहन चालवणे सुलभ करण्यासाठी, ट्रक चालकांसाठी महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर, पंजाब मध्ये फतेहगढ साहिब, गुजरात मध्ये सोनगढ, आणि कर्नाटकमध्ये बेळगावी आणि बंगलोर ग्रामीण, या ठिकाणी महामार्गालगतच्या सुविधांचे उद्घाटन
– पेट्रोल, डिझेल, सीएनजी, सीबीजी, इथेनॉल मिश्रित पेट्रोल (ईबीपी) इत्यादी ऊर्जानिर्मितीचे विविध पर्याय एकाच किरकोळ विक्री केंद्रात पुरवण्यासाठी ऊर्जा स्थानकांचे उद्घाटन
– ५०० ईव्ही चार्जिंग सुविधांचे लोकार्पण करणार आहेत.
– द्रवरूप नैसर्गिक वायू – एलएनजीच्या २० स्थानकांचे लोकार्पण
– सोलापूर विमानतळाचे उद्घाटन
– बिडकिन औद्योगिक क्षेत्राचे लोकार्पण करणार आहेत.
कार्यक्रमावर पावसाचे सावट
शहर आणि जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा पुणे वेधशाळेने दिला असून, पंतप्रधानांच्या पुणे दौऱ्यातील कार्यक्रमावर पावसाचे सावट निर्माण झाले आहे.
पंतप्रधानांचा कार्यक्रम एसपी महाविद्यालयाच्या मैदानावर होणार असून, तेथे बुधवारी झालेल्या पावसाने तळे साचले आहे. जिल्हा आणि मेट्रो प्रशासन हे पाणी काढण्यासाठी प्रयत्न करत आहे.





