ASEAN Summit 2026 : पंतप्रधान मोदींनी मांडला खलाशी सुरक्षा उपक्रम; पूर्व आशिया शिखर परिषदेला केले संबोधित
पूर्व आशिया शिखर परिषद ही आशिया-प्रशांत प्रदेशातील सुरक्षा आणि संरक्षणाशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करणारे प्रमुख व्यासपीठ आहे. ही परिषद २००५ मध्ये स्थापन झाली.

ASEAN Summit 2026 – पूर्व आशिया शिखर परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त प्रशिक्षण आणि आपत्कालीन प्रतिसादाला चालना देण्यासाठी खलाशांच्या सुरक्षा उपक्रमाच्या प्रारंभाची घोषणा केली. सामायिक समृद्धीसाठी जीवनवाहिनी असलेल्या समुद्राच्या सुरक्षेसाठी सागरी सुरक्षा आणि मुक्त नौवहन हे आवश्यक असल्याच्या मुद्द्यांवर विशेष भर दिला.
सध्याच्या आपत्ती आणि संघर्षाच्या युगामध्ये शांततेसाठीच्या सर्व प्रयत्नांना सहाय्य करण्यासाठी संवाद, परस्परांचा आदर आणि सहकार्याच्या गरजेवरही त्यांनी भर दिला. अन्न, इंधन आणि खतांच्या सुरक्षेवर संघर्षांमुळे झालेला परिणाम अधोरेखित करतानाच पंतप्रधानांनी जहाजांची सुरक्षा आणि संरक्षण जपण्याचीही अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
संघर्षांमुळे आंतरराष्ट्रीय जलमार्गांमध्ये व्यापारी जहाजे आणि खलाशांवर सातत्याने होत असलेल्या घटनांकडे त्यांनी लक्ष वेधले. क्रेन आणि पश्चिम आशियातील संघर्षावर शांततामय मार्गाने तोडगा शोधण्याच्या सर्व प्रयत्नांना भारताचा पाठिंबा असल्याचेही पंतप्रधानांनी नमूद केले. सागरी सुरक्षा उपक्रमामुळे आपात्कालिन प्रतिसादासाठी संयुक्त प्रशिक्षणासाठीच्या सहकार्यामध्ये वाढ होईल, असे ते म्हणाले.
पूर्व आशिया शिखर परिषद ही आशिया-प्रशांत प्रदेशातील सुरक्षा आणि संरक्षणाशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करणारे प्रमुख व्यासपीठ आहे. ही परिषद २००५ मध्ये स्थापन झाली. तेंव्हापासून या परिषदेने पूर्व आशियाच्या सामरिक, भू-राजकीय आणि आर्थिक विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. आसियानच्या ११ सदस्य राष्ट्रांव्यतिरिक्त, पूर्व आशिया शिखर परिषदेत भारत, चीन, जपान, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अमेरिका आणि रशिया यांचा समावेश आहे.
पंतप्रधानांनी डिजिटल जगात विश्वास आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्याचे आवाहनही केले. ऑनलाइन फसवणूक आणि सायबर गुन्हे यांसारख्या सीमापार गुन्ह्यांमुळे निर्माण होणाऱ्या नव्या धोक्यांना तोंड देण्यासाठी भारत पूर्व आशिया शिखर परिषदेच्या सायबर क्राईम कॉन्फरन्स’चे आयोजन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.






