पंतप्रधान मोदी राजस्थान मुख्यमंत्र्यांच्या सापळ्यात अडकले?

जयपूर – राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत ( Chief Minister Ashok Gehlot) यांनी रचलेल्या सापळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी अडकले. राजस्थान सरकारचे काम चांगले असल्याची कबुलीच एकप्रकारे मोदींनी दिली, असे भाष्य कॉंग्रेसने सोमवारी केले.
राजस्थानात कॉंग्रेस सरकारने सुरू केलेल्या योजना बंद न करण्याची हमी मोदींनी द्यावी, असे वक्तव्य गेहलोत यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. त्याचा आधार घेऊन मोदींनी कॉंग्रेसने अप्रत्यक्षपणे राजस्थानमधील पराभव मान्य केल्याचे म्हटले.
भाजप योजना बंद करणार नाही. उलट, त्यात सुधारणा करेल, अशी टिप्पणीही मोदींनी केली. त्यावर कॉंग्रेसचे नेते पवन खेरा यांनी पत्रकारांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. भाजपला राजस्थानची सत्ता मिळाल्यास गेहलोत सरकारच्या योजना सुरू ठेवण्याची ग्वाही मोदींनी दिली.
कॉंग्रेस सरकारच्या योजना चांगल्या आहेत. त्यामुळे भाजपला कोण मतं देईल, असा सवाल त्यांनी केला. आमच्या सरकारने चांगले काम केले असल्याने मतंही आम्हालाच मिळतील, असा विश्वासही खेरा यांनी व्यक्त केला. कॉंग्रेसची सत्ता असणाऱ्या राजस्थानात लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे.





