Mahakumbh: प्रयागराजला जाणाऱ्या विमानांच्या तिकिटांचे दर वाढले

मुंबई – प्रयागराजमध्ये 13 जानेवारीपासून महाकुंभमेळ्याला प्रारंभ झाला असून 44 दिवस म्हणजेच 26 फेब्रुवारीपर्यंत हा कुंभमेळा सुरू राहणार आहे. सध्या प्रयागराजमध्ये दररोज करोडोंच्या संख्येने भाविक दाखल होत आहेत. पण प्रयागराजला जाण्यासाठी नागरिकांकडून विमान प्रवासाला पसंती देण्यात येत आहे. ज्यामुळे विमान प्रवासाच्या दरात मोठी वाढ झाली आहे.
कुंभमेळ्यात सहभागी होणाऱ्या भाविकांसाठी देशभरातून विशेष ट्रेन सोडण्यात आलेल्या आहेत. पण अनेक भाविकांकडून विमान सेवेला सुद्धा सर्वाधिक पसंती दिली जात आहे. ज्यामुळे प्रयागराजला जाणाऱ्या विमानांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीहून प्रयागराजला जाणाऱ्या विमानाच्या तिकीट दरात 21 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
त्याचप्रमाणे, मुंबई-प्रयागराज विमानांच्या तिकीट दरांमध्ये 13 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे या मार्गावरील विमान भाडे आता सरासरी 6 हजार 381 रुपये झाले आहे. मध्य प्रदेशातील भोपाळ ते प्रयागराज मार्गावरील विमानांच्या भाड्यात सर्वाधिक म्हणजेच तब्बल 498 टक्क्यांची वाढ झाली आहे.
भोपाळ ते प्रयागराज यासाठीचे विमानाचे दर साधारणतः दोन ते तीन हजार रुपयांच्या दरम्यान असतात, परंतु महाकुंभमेळ्यामुळे हे दर 17 हजार रुपयांच्या वर पोहोचले आहेत. भोपाळ प्रयागराजला जाण्यासाठी प्रवाशांना 17 हजार 796 रुपये मोजावे लागत आहेत. तर, बंगळुरू ते प्रयागराजच्या भाड्यात 89 टक्के आणि अहमदाबाद ते प्रयागराजच्या भाड्यामध्ये 41 टक्के वाढ झाली आहे.
प्रयागराजला जाणाऱ्या विमानांच्या तिकिटांमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये 162 टक्क्यांनी वाढ झाली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, लखनऊ ते प्रयागराज हे अंतर कमी असताना देखील यामध्ये 42 टक्क्यांनी आणि वाराणसी ते प्रयागराजमधील विमान प्रवासात तब्बल 127 टक्क्यांची वाढ झाली आहे.





