इलेक्ट्रिक वाहनांचे दर लवकरच पेट्रोल वाहनांइतके होणार : नितीन गडकरी

नवी दिल्ली – भारतातील इलेक्ट्रिक वाहनांची विक्री वेगाने वाढत आहे. त्यामुळे उत्पादनही वेगाने वाढत आहे. या क्षेत्रात कंपन्या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. अशा परिस्थितीत इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनाचा खर्च वेगाने कमी होत असून पुढील चार ते सहा महिन्यांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांचे दर पेट्रोलवरील वाहनांइतकेच होतील असा दावा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे.
फिक्की या उद्योजकाच्या संघटनेने आयोजित केलेल्या उच्च शिक्षण परिषदेत बोलताना गडकरी यांनी सांगितले की. भारत सरकारनेही इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीला आणि विक्रीला अनुदान आणि इतर माध्यमातून चालना दिलेली आहे. त्यामुळे या क्षेत्रात कमालीचे सकारात्मक वातावरण आहे. गडकरी यांनी आपला दावा सिद्ध करण्यासाठी यापेक्षा जास्त तपशील दिला नाही.
ते म्हणाले की, पुढील पाच वर्षात भारतातील वाहन उद्योग जगात पहिल्या क्रमांकाचा होईल. दहा वर्षांपूर्वी भारतातील वाहन उद्योग 14 लाख कोटी रुपयांचा होता. तो आता 22 लाख कोटी रुपयांचा झाला आहे. अमेरिकेतील वाहन उद्योग 78 लाख कोटी रुपयाचा, चीनमधील वाहन उद्योग 47 लाख कोटी रुपयांचा आहे. इथेनॉल निर्मितीमुळे शेतकर्यांना अतिरिक्त 45 हजार कोटी रुपये मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले. भारत दरवर्षाला 22 लाख कोटी रुपयांच्या इंधनाची आयात करतो. ही आयात इथेनॉलमुळे कमी होत आहे.





