डाळिंबाला 191 रुपये प्रतिकिलो भाव

पुणे – मार्केटयार्डात डाळींबाची आवक घटत चालली आहे. त्या तुलनेत मागणी जास्त असल्याने घाऊक बाजारात डाळींबाच्या भावात वाढ झाली आहे. घाऊक बाजारात प्रतिकिलोस 50 ते 150 रुपये भाव मिळत आहे. एका शेतकऱ्याच्या उच्च दर्जाच्या डाळिंबास प्रतिकिलोस तब्बल 191 रुपये भाव मिळाला.
गेल्या काही महिन्यांपासून डाळींबाला भाव मिळत नसल्याने शेतकरी उत्पादक हवालदील झाले होते. मात्र, गुरुवारी मार्केटयार्डात इंदापूर तालुक्यातील कौठळी येथील शेतकरी हौशीराम आबा आटोळे यांच्या डाळींबास तब्बल 191 रुपये प्रतिकिलोस भाव मिळाला. आडते यशवंत कोंडे यांच्या गाळ्यावर डाळिंबाची आवक झाली होती. याबाबतची माहिती आडते यशराज कोंडे यांनी दिली. आटोळे यांच्या 37 क्रेटमधील डाळींबास 191 रुपये प्रतिकिलोस भाव मिळाला. ही खरेदी व्यापारी राजू सुर्यवंशी यांनी केली. प्रत्येक क्रेटमध्ये सरासरी 20 ते 25 किलो डाळींब असते. गुरुवारी मार्केटयार्डात 30 ते 35 टन डाळींबाची आवक झाली होती. पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्यांतून ही आवक झाली तर पुणे शहरातील फळेविक्रेते तसेच राजस्थान, गुजरात आणि उत्तर प्रदेशातील व्यापाऱ्यांनी डाळिंबाची खरेदी केली.
गेल्या आठवड्यापासून डाळिंबाच्या भावात वाढ होत आहे तसेच उच्च दर्जाचा मालही बाजारात दाखल होत आहे मागणीही मोठ्या प्रमाणात आहे.
– यशराज कोंडे, आडते





