छत्रपती संभाजीनगर : बांगलादेशी म्हणून खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी भाजप नेते आणि माजी खासदार डॉ. किरीट सोमय्यांकडून दबाव आणण्यात येत असल्याचे खळबळजनक आरोप सिल्लोडचे उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण यांनी केले आहे. या आरोपांनंतर राजकारणासह प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली असून अर्थसंकल्पयीय अधिवेशनादरम्यानच हा मुद्दा समोर आल्याने यावरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. सिल्लोड तालुक्यात बनावट जन्म प्रमाणपत्र देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी पोलिसांनी शहरातील तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. परंतु किरीट सोमय्या यांनी मात्र सिल्लोड येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयातून बांगलादेशातील 406 जणांना बनावट जन्म प्रमाणपत्र देण्यात आल्याचा आरोप केला आहे. या अनुषंगाने त्यांनी नुकतीच तिसऱ्यांदा सिल्लोड येथे येऊन पोलीस ठाण्यास भेट दिली होती. ज्या 406 लोकांविरुद्ध सोमय्या यांनी तक्रार केली होती, त्यांची तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक व नेमलेल्या पथकमार्फत चौकशी करण्यात आली आहे. ते नागरिक स्थानिक रहिवासी असल्याचे पुरावे आढळले आहेत. आम्ही एकही बांगलादेशीला जन्म प्रमाणपत्र दिले नाही. तसा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना दोन दिवसांपूर्वी दिला आहे. कुणी बांगलादेशी आढळलाच नाही, तर आम्ही खोटे गुन्हे कसे दाखल करणार? 403 लोकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यासाठी माझ्यावर दबाव टाकण्यात येत आहे, असा दावा लतीफ पठाण यांनी केला.