अल्जियर्स (अल्जेरिया) – भारताची स्थिती, प्रतिष्ठा आणि परदेशाबाबतची भूमिका वर्धित करण्यासाठी भारतीय समुदायाने दिलेल्या योगदानाचे भारत सरकार आणि भारतीय समाजाला नेहमीच कौतुक वाटले आहे, अशा शब्दांमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अल्जेरियातल्या भारतीय समुदायाशी संवाद साधला. दोन दिवसांच्या भेटीवर राष्ट्रपती अल्जेरियामध्ये काल रात्री दाखल झाल्या. आज त्या अल्जेरियाचे अध्यक्ष अब्देलमादजीद तेब्बौन यांची भेट घेणार आहेत. याशिवाय शापूरजी पालोनजी या भारतीय कंपनीने बांधलेल्या किंग अब्दुल्ला विज्ञान आणि तंत्रज्ञान केंद्रालाही त्या भेट देण्याची शक्यता आहे. रविवारी अल्जेरियामध्ये दाखल झाल्यावर राष्ट्रपती मुर्मू यांनी सर्वप्रथम भारतीय समुदायाशी संवाद साधला. अल्जेरियातील भारतीय समुदाय हा भारताचे हित आणि सॉफ्ट पॉवर पुढे नेणारा पूल आहे, असे त्या यावेळी म्हणाल्याचे राष्ट्रपती भवनाकडून एक्सवर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. देश विकसित होण्याच्या मार्गाने वेगाने मार्गक्रमण करत आहे आणि १.४ अब्ज नागरिकांच्या सामुहिक प्रयत्नांतून आपण आशा आणि आकांक्षांचा हा प्रवास सुरू केला आहे. अल्जेरिया आणि विदेशातील भारतीय समुदायाच्या सदिच्छा आणि पाठिंब्याशिवाय हे शक्य नाही, असे राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या. अल्जेरियातील भारतीय समुदायाच्या पाठिंब्यामुळे भारतातील विकासाची लाट नव्या उंचीला पोचेल, असेही त्या म्हणाल्या. वसाहतवादाला भारताने पहिल्यापासून विरोध केला होता आणि अल्जेरियाच्या स्वातंत्र्यलढ्याला पाठिंबा दिला होता आणि भारतीय नेत्यांचे अल्जेरियातील नेत्यांशी कसे जवळचे वैयक्तिक संबंध आहेत, याची आठवणही त्यांनी करून दिली. अल्जेरियात भारतीय सिनेमा, मालिका लोकप्रिय आहेत. अल्जेरियामध्ये सुमारे ४ हजार भारतीय नागरिक राहतात आणि विविध प्रकल्प आणि कंपन्यांमध्ये काम करत आहेत. आमचे कुशल कामगार आणि तंत्रज्ञ दुर्गम भागात कठीण परिस्थितीत काम करत आहेत. अल्जेरियामध्ये अनेक सार्वजनिक आणि खाजगी भारतीय कंपन्या कार्यरत आहेत, असेही त्यांनी सांगितले. अल्जेरियातील नेत्यांचे भारताशी जुने संबंध… नॅशनल लिबरेशन फ्रंट ऑफ अल्जेरियाचे प्रमुख ५० च्या दशकाच्या उत्तरार्धात आणि ६० च्या दशकाच्या सुरुवातीला भारतात उपस्थित होते. 1962 मध्ये जेव्हा अल्जेरिया स्वतंत्र झाला तेव्हा भारत अल्जेरियाला पाठिंबा देण्यासाठी तिथे उपस्थित होता आणि आम्ही लगेचच नवीन राज्याशी राजनैतिक संबंध प्रस्थापित केले. तेव्हापासून राजनैतिक संबंध अनेक पटींनी वाढले आहेत, असेही राष्ट्रपती मुर्मू यांनी सांगितले.