ऑकलंड (न्यूझीलंड) – तीन देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज न्यूझीलंडमध्ये दाखल झाल्या. फिजीचा दौरा संपवून मुर्मू न्यूझीलंडमध्ये पोहोचल्या आहेत. फिजीमध्ये त्यांनी फिजीबरोबरचे ऐतिहासिक संबंध वाढवण्यासाठी आणि दोन्ही देशांमधील भागीदारी मजबूत करण्यासाठी व्यापक चर्चा केली आहे. राष्ट्रपती मुर्मू न्यूझीलंडचे गव्हर्नर-जनरल डेम सिंडी किरो, पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन आणि इतर वरिष्ठ मंत्र्यांची भेट घेणार आहेत. कारण या नेत्यांबरोबरच्या चर्चेत त्या भारत द्विपक्षीय संबंधांना अधिक चालना देऊ इच्छित आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे न्यूझीलंडमध्ये आगमन होताच न्यूझीलंडचे कृषी, व्यापार, वनीकरण, शिकार आणि मासेमारी आणि सहयोगी परराष्ट्र व्यवहार मंत्री टॉड मॅकले यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले, असे परराष्ट्र मंत्रालयाने एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. ही भेट आमच्या संबंधांना अधिक दृढ करण्यासाठी आणि दोन्ही देशांच्या नागरिकांमधील मजबूत थेट संपर्क आणि सांस्कृतिक संबंधांना चालना देण्यासाठी अलीकडील अनेक सरकारी प्रयत्नांचा एक आहे, असे मॅकले यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. गव्हर्नर जनरल यांच्या निमंत्रणावरून राष्ट्रपती मुर्मू न्यूझीलंडमध्ये आल्या आहेत. आठ वर्षांनंतर भारताच्या राष्ट्रपतींनी न्यूझीलंडला भेट दिली आहे. गव्हर्नर जनरल किरो यांच्याशी चर्चेशिवाय राष्ट्रपती मुर्मू पंतप्रधान लक्सन आणि उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री विन्स्टन पीटर्स यांचीही भेट घेणार आहेत. मुर्मू ऑकलंडमधील सामुदायिकस्वागत समारंभालाही उपस्थित राहतील. जिथे त्या भारतीय समुदायाशी आणि फ्रेंड्स ऑफ इंडिया या भारतीयांच्या गटाशी संवाद साधतील. न्यूझीलंडच्या एकूण ५ दशलक्ष लोकसंख्येमध्ये भारतीय समुदायाची संख्या ३ लाख इतकी आहे. न्यूझीलंडने द्विपक्षीय संबंधांसाठी भारता बरोबरच्या संबंधांवर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. न्यूझीलंड भारताला संरक्षण आणि सुरक्षा आणि एकूण द्विपक्षीय व्यापार, गुंतवणुक, लोकांशी संपर्क इत्यादींच्या दृष्टीने महत्त्वाचा भागीदार मानतो. त्यामुळे ही भेट भारताबरोबर न्यूझीलंडसाठी देखील अत्यंत महत्त्वाची आहे.