Pimpari : देहूत येणाऱ्या वारकरी भाविकांसाठी अन्नदानाची महातयारी; संत तुकाराम अन्नदान मंडळाचा प्रतिवर्षाचा उपक्रम

देहूगाव: श्री क्षेत्र देहूमध्ये संत तुकाराम अन्नदान मंडळांकडून प्रतिवर्ष आषाढी वारी पालखी सोहळ्यात लाखो वारकरी भाविकांसाठी चार दिवस महाअन्नदान करण्यात येते. यंदा बुधवारी (दि. १८ जून) रोजी संत तुकाराम महाराज यांची पालखी देहूतून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार आहे. त्यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक, गोपाळपुरा वैकुंठगमन स्थान या दोन्ही ठिकाणी संपूर्ण दिवस अन्नदान करण्यात येणार आहे.
श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील भाविक, वारकऱ्यांसाठी तीर्थक्षेत्र देहूत असंख्य देणगीदारांच्या दानातून, लोकवर्गणीतून संत तुकाराम अन्नदान मंडळ गेली ३० वर्षांपासून अन्नदानाचा उपक्रम राबवित आहे. यंदा उपक्रमाचे ३१ वे वर्ष असून १६ ते १८ जुन रोजी देहूगाव येथील छत्रपती श्री शिवाजी महाराज चौकामध्ये आणि आषाढी एकादशी २१ जुलै रोजी (पालखी पुनरागमन दिनी) चिंचोली येथील शनी मंदिरात महाप्रसादाचे (अन्नदान) वाटप करण्यात येणार आहे.
भाविकांसाठी आचारधर्म प्रसिद्ध
१. दिंडीतील सर्व पताका (वारकरी ध्वज) सुती कापड असलेल्या आणि काव रंगाचा वापर केलेल्या असाव्यात.
२. पताकाधारी मागे टाळकरी, मृदंग वादक, विणेकरी, नंतर तुळशीवाली, महिला वारकरी असा क्रम असावा.
३. वारकऱ्यांनी पांढरे धोतर, शर्ट, टोपी अथवा पायजमा परिधान करावा. विणेकऱ्याने धोतर, फेटा परिधान करावे.
४. दिंडीतील भजन वारकरी संप्रदायाच्या देहूकर फडाप्रमाणे असावे, काकडा हा सकाळी लवकर व्हावा.
५. दिंडीत सहभागी होऊन कोणतेही व्यसन करू नये. दिंडीत चालताना सोहळा सोडून मागे-पुढे चालू नये.
६. रिंगणात दिंडीतील सर्व पताकावाले, टाळकरी, विणेकरी, तुळशी वाली, हांडेवाली, पखवाज सहभागी व्हावे.





