Diwali 2026: चकली-करंजीच्या तयारीला वेग; दिवाळीच्या फराळासाठी किराणा बाजारात गर्दी
Diwali 2026: खाद्यतेल, तूप आणि सुकामेव्याला मागणी

पिंपरी – दिवाळीच्या फराळाचा सुगंध घराघरांत दरवळण्याची तयारी सुरू झाली आहे. चकली, करंजी, लाडू आणि चिवड्यासाठी लागणारे साहित्य खरेदी करण्याकडे महिलांचा कल वाढला आहे. त्यामुळे शहरातील किराणा दुकाने, सुपर मार्केट आणि मॉल्समध्ये ग्राहकांची गर्दी होत आहे.
खाद्यतेल, तूप, सुकामेवा आणि विविध पिठांच्या खरेदीला विशेष मागणी आहे. ऐन सणात होणारी धावपळ टाळण्यासाठी अनेक कुटुंबांनी आतापासूनच फराळाच्या साहित्याची जमवाजमव सुरू केली आहे.
दिवाळी जवळ आल्याने शहरात सणाची लगबग वाढली आहे. घरांची स्वच्छता, रंगरंगोटी आणि रोषणाईसोबतच फराळाच्या तयारीलाही वेग आला आहे. पारंपरिक पदार्थ घरीच तयार करण्यासाठी महिला किराणा बाजारात खरेदी करत आहेत. सांगवी, पिंपरी, चिंचवड, भोसरी, आकुर्डी, चिखली आणि निगडी परिसरातील बाजारपेठांमध्ये विविध वस्तूंची खरेदी सुरू आहे.
नेहमीच्या खरेदीसाठी अनेक नागरिक स्थानिक किराणा दुकानांना पसंती देत आहेत. तर नोकरदार वर्ग आणि तरुण कुटुंबे एकाच ठिकाणी सर्व साहित्य मिळावे म्हणून सुपर मार्केट आणि मॉल्सकडे वळत आहेत. त्यामुळे व्यापारी संकुले आणि प्रमुख बाजारपेठांमध्ये दिवसभर ग्राहकांची वर्दळ दिसत आहे. आवश्यक साहित्याची यादी घेऊन महिला खरेदी करताना दिसत आहेत.
दिवाळी फराळातील पारंपरिक पदार्थांसाठी लागणाऱ्या जिन्नसांची खरेदी वाढली आहे. चकलीसाठी भाजणी, बेसन आणि तांदळाचे पीठ, तर शंकरपाळ्यांसाठी मैदा आणि रवा खरेदी केला जात आहे. चिवड्यासाठी पातळ पोहे, भाजके पोहे आणि शेंगदाण्यांना मागणी आहे.
करंजी आणि लाडू तयार करण्यासाठी खोबरे, डाळी, गूळ आणि साखरेची खरेदीही सुरू आहे. फराळातील पदार्थांची चव वाढवण्यासाठी काजू, बदाम, मनुका आणि वेलची यांची खरेदी केली जात आहे. विविध मसाले आणि इतर पूरक साहित्यालाही मागणी आहे. घरच्या घरी दर्जेदार फराळ तयार करण्यासाठी ग्राहक साहित्याच्या निवडीवर भर देत आहेत.
दिवाळीच्या अखेरच्या दिवसांत बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी अनेक नागरिक आधीच किराणा भरून घेत आहेत. वाहतूक कोंडी आणि दुकानांमधील गर्दी लक्षात घेऊन काही कुटुंबांनी महिन्याच्या गरजेचे साहित्य एकाच वेळी खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. सणाचे दिवस जवळ येत असल्याने आगामी काळात बाजारपेठांमधील खरेदीचा वेग आणखी वाढण्याची शक्यता आहे.
खाद्यतेल आणि तुपाला विशेष पसंती
फराळाचे पदार्थ तळण्यासाठी शेंगदाणा तेल आणि रिफाइंड तेलाची खरेदी केली जात आहे. लाडू आणि इतर गोड पदार्थांसाठी शुद्ध तुपालाही मागणी आहे. त्यामुळे किराणा खरेदी करताना तेल आणि तूप या वस्तूंना ग्राहक प्राधान्य देत आहेत.
Satara: जिल्ह्यातील वर्चस्व ठरविण्यासाठी आज मतदान; जिल्हा बँक निवडणुकीसाठी २०२१ मतदार बजावणार हक्क





