Pune District : पुणे-नाशिक रेल्वेसाठी जनआंदोलनाची तयारी
Pune District : चाकण ते सिन्नरदरम्यान नागरिकांना एकत्र आणून व्यापक जनसमर्थन उभे करण्याची रणनीती आळेफाटा येथे झालेल्या समितीच्या अंतिम निर्णायक बैठकीत निश्चित करण्यात आली.

आळेफाटा : पुणे आणि नाशिक या दोन महत्त्वाच्या औद्योगिक शहरांना जोडणाऱ्या बहुप्रतीक्षित पुणे-नाशिक रेल्वेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. रेल्वेचा मार्ग सरळ असावा आणि या प्रकल्पाला गती मिळावी, यासाठी आता केवळ बैठका न घेता रस्त्यावर उतरून जनजागृती करण्याचा निर्धार पुणे-नाशिक रेल्वे कृती समितीने केला आहे.
चाकण ते सिन्नरदरम्यान नागरिकांना एकत्र आणून व्यापक जनसमर्थन उभे करण्याची रणनीती आळेफाटा येथे झालेल्या समितीच्या अंतिम निर्णायक बैठकीत निश्चित करण्यात आली. पुणे-नाशिक रेल्वे सरळमार्गाने झाल्यास पुणे, नगर आणि नाशिक परिसरातील ग्रामीण भागाला विकासाची नवी दिशा मिळू शकते. शेतकऱ्यांना शेतीमालाच्या वाहतुकीसाठी, विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी, नोकरदारांना प्रवासासाठी, तर व्यापारी आणि उद्योजकांना व्यवसायवृद्धीसाठी या रेल्वेचा मोठा फायदा होणार आहे.
विशेषतः चाकण, राजगुरुनगर, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, संगमनेर आणि सिन्नर परिसरातील गावांच्या विकासाला या रेल्वेमुळे चालना मिळू शकते. त्यामुळे रेल्वेचा मार्ग सरळ असणे ही केवळ प्रवासाची गरज नसून ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाची मागणी असल्याची भूमिका बैठकीत मांडण्यात आली.
पुणे-नाशिक रेल्वेचा प्रश्न हा केवळ दोन शहरांना जोडणाऱ्या रेल्वेमार्गाचा नाही, तर या मार्गावरील शेकडो गावांच्या भवितव्याचा आहे. त्यामुळे आता या मागणीसाठी जनतेचा आवाज बुलंद करण्याची वेळ आली असून, आगामी काळात या आंदोलनाला किती व्यापक स्वरूप मिळते, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.
या बैठकीस पुणे-नाशिक रेल्वे कृती समितीचे कार्याध्यक्ष संतोष फापाळे, उपाध्यक्ष राजेंद्र चौधरी, शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास धनवटे, राहुल ढेंबरे पाटील, बाबाजी चासकर, संभाजी बोडके, दत्ता ढगे, प्रवीण कवडे, तुळशीदास तांबे, श्री संत सावता महाराज मंदिराचे अध्यक्ष गणेश वाघमारे, विश्वस्त सचिन गडगे, संतोष पादीर, अॅड. किशोर गाडेकर, कैलास लामखडे, नीलेश वाघमारे, भानुदास निळवंडे, सुदाम कराळे, सचिन घोडके, भाऊसाहेब वाकचौरे आदी उपस्थित होते.
लढ्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन
या मागणीला व्यापक जनसमर्थन मिळविण्यासाठी पुढील आठवड्यात परिसरातील सर्व लोकप्रतिनिधींच्या भेटी घेण्यात येणार आहेत. तसेच, चाकण ते सिन्नर या संपूर्ण पट्ट्यात जनजागृती मोहीम राबवून रेल्वे प्रकल्पाचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. या प्रश्नावर लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, व्यापारी संघटना, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांनी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून एकत्र यावे, असे आवाहनही करण्यात आले.





