पाच राज्यातील निवडणुकांची जय्यत तयारी सुरू, 50हजार जवानांचा असणार बंदोबस्त

नवी दिल्ली – ज्या पाच राज्यांमध्ये निवडणूका होणार आहेत त्या राज्यांतील सुरक्षा व्यवस्थेसाठी निवडणूक आयोगाने सुरूवातीच्या टप्प्यात 50 हजार सुरक्षा जवानांची जमवाजमव केली असून त्यातील बहुतांशी जवान उत्तरप्रदेशात पाठवले जाणार आहेत.
हे जवान केंद्रीय सशस्त्र दलांचे आहेत. त्यात सीआरपीएफ, बीएसएफ, आयटीबीपी, सीआयएसएफ, एसएसबी अशा निमलष्करी दलांच्या जवानांचा समावेश आहे. त्यांच्या पाचशे कंपन्या सुरूवातीच्या टप्प्यात तैनात केल्या जाणार असून अशा अजून शंभर ते दीडशे कंपन्या या कामी तैनात केल्या जाणार आहेत. पाचशे कंपन्यांपैकी 375 कंपन्या उत्तरप्रदेशला पाठवल्या जाणार आहेत.
एका कंपनीत 70 ते 80 जवान असतात. यंदा कोविडमुळे मतदान केंद्रांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे त्याच्या बंदोबस्ताला जादा जवानांची गरज सगळीकडेच भासणार आहे. त्याची आधी पासूनच तरतूद केली जात असून निवडणूक प्रचार काळात होणारे गैरप्रकार रोखण्यासाठीही या जवानांचा उपयोग करून घेतला जाणार आहे.





