पुण्याचे प्रतिपंढरपूर – विठ्ठलवाडी

एकेकाळी पुण्याबाहेर असलेले पण, आता पुण्याचाच एक भाग असलेल्या हिंगणे खुर्द येथील विठ्ठलाचे मंदिर अत्यंत देखणे आहे आणि मंदिराचे प्राचिनत्त्व टिकवून ठेवले आहे. मुठा नदीच्या किनाऱ्यावर आजही वनश्रीने नटलेला हा परिसर आहे. आषाढ महिन्यात पावसाळ्यात हिरवाईने सजलेला हा परिसर देवाचे पावित्र्य वाढवतो आणि एकादशीला येथे होणाऱ्या यात्रेला प्रसन्नही करतो.
हिंगणे खुर्द भागात नदीकाठी पेशवाई काळाच्याही आधी येथे विट्ठल मंदिर उभारले गेले. भव्य दगडी बांधकाम आणि रेखीवपणामुळे या परिसराला “विठ्ठलवाडी’ संबोधले जाऊ लागले. येथील विठ्ठलभक्त संभाजीबुवा चावट-गोसावी यांनी या मंदिराची उभारणी केली, त्यांची समाधी या मंदिराच्या सभागृहात आहे. गर्भगृह आणि दोन मोठे सभागृह अशा तीन टप्प्यांत हे मंदिर विस्तारलेले आहे. मुठा नदीकाठच्या दगडांमध्येच साकारलेले हे मंदिर भव्य आहे. मंदिरात एक विहीर आहे. मुख्य प्रवेशद्वारावर नगारखाना आहे. मोठ्या लांब लांब ओवऱ्या, भक्कम तटबंदी, सज्जावर जाण्यासाठी असलेले दगडी जिने, चार-पाच मुख्य दरवाजे, अत्यंत सुंदर दगडी तुळशी वृंदावन या मंदिराचे वैभव सांगून जाते.
मंदिराला असलेले दगडी खांब कोरीव आहेत. मुख्य मंदिरातील खांब ओबडधोबड आहेत; पण, नंतर विस्तारीत सभागृहातील काम अत्यंत सुबक आहे. मंदिरात विठ्ठल-रुक्मिणीच्या हसऱ्या-रेखीव मूर्ती आहेत आणि याचबरोबर गरूड, शनी, मारुती, गणपती, दत्त, दशावतार यांच्या मूर्तीही आहेत. मंदिराच्या मुख्य दरवाजातून आत आले की, उजवीकडे शंकराचे मंदिर आहे. येथील पिंडही भव्य अशीच आहे. मंदिराचे प्रांगण आणि प्रदक्षिणा मार्ग विस्तृत आहे. मंदिरात सांप्रदायिक सर्व धार्मिक उपचार होतात. या विठ्ठलाच्या मंदिरात आषाढीला परिसरातील लाखो लोक दर्शनासाठी येतात, त्यामुळे या परिसराला चार दिवस जत्रेचे स्वरूप येते.
प्रतिपंढरपूरचे महत्त्व…
विठ्ठल मंदिराच्या उजव्या बाजूला नदीपात्रात पुंडलिकाचे मंदिर आहे, जसे ते पंढरपूरला आहे आणि चंद्रभागेला जसे चंद्रासारखे वळण पुंडलीक मंदिराजवळ आहे, तसेच वळण येथे मुठा नदीला आहे आणि त्यामुळेच या मंदिराला प्रतिपंढरपूर म्हटले जात असावे.
छत्रपती शाहू महाराजांकडून इनाम…
मंदिराच्या देखभालीसाठी छत्रपती शाहू महाराजांनी काही जमीन इनाम दिली होती, अशी नोंद आहे. 1732 पूर्वी कधीतरी या मंदिराचे बांधकाम झाले आहे. कारण, त्यावर्षी निजामाने पुण्यावर स्वारी केली, त्यात या मंदिराचे बरेच नुकसान झाले होते. त्यानंतर थोरले माधवराव पेशवे यांनी मंदिराचा जीर्णोद्धार करून पेशवाई पद्धतीने त्याचे गढीवजा दगडी बांधकाम केले.
ताम्रपटावरील मजकूर
1842 मधील एका ताम्रपटानुसर मंदिराची देखभाल गोसावी कुटुंबाकडे आहे. या कुटुंबाने पुढे मंदिरात महादेव मंदिर आणि हरिदास वेस बांधली आहे.
मराठी चित्रपटांचे चित्रीकरण…
विठ्ठलवाडी मंदिराचा परिसर निसर्गरम्य असल्याने “सांगत्ये ऐका’, “कच्चे धागे’ अशा अनेक चित्रपटांचे शूटिंग या परिसरात झाले आहे. मंदिर परिसर आणि नदीकाठ चित्रकारांचे मुख्य आकर्षण आहे. एके काळी पुणेकरांचे हे सहलीचे ठिकाण होते. सूर्यास्तानंतर या भागातून किर्र झाडी आणि अंधारलेला रस्ता यामुळे चिटपाखरुपण नसे. मात्र, आता हे ठिकाण पुण्याचाच एक भाग झाला असल्याने खूप विस्तारले असून येथे कायमच गर्दी असते.
मूर्ती शेतात सापडल्या…
या मंदिरातील विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्ती येथे राहणारे संभाजी चावट गोसावी यांना त्यांच्या शेतात सापडल्या. ते पांडुरंग भक्त होते आणि नेहमी पंढरीला जात होते. काही काळ या मूर्ती त्यांच्या शेतातील चौथऱ्यावर ठेवून तेथेच छोटे मंदिर बांधलेले होते. कालांतराने या मूर्ती भव्य मंदिरात विराजमान झाल्या.
।। राम-कृष्ण हरी ।।





