कुकुटपालनासह हंगामी व्यवसायातून कष्टाने प्रतिभा शिंदे यांनी मिळवली स्वतःची ओळख

माणदेशी फाउंडेशन आणि माणदेशी महिला सहकारी बॅंक या दोन्ही संस्थांनी महिलांना समाजात स्वतःची ओळख निर्माण करून देण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यामुळे स्वावलंबी बनून स्वाभिमानाने जगण्यासाठीची प्रेरणा महिलांना मिळाली. कष्ट आणि मेहनतीच्या जोरावर प्रतिभा शिंदे यांनी शेती व कुकुटपालनासह हंगामी व्यवसायांची जोड देत कुटुंबाला आर्थिक स्थिरता मिळवून दिली. स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी त्यांनी संघर्ष केला. रसवंतीगृहापासून गणेशोत्सवातील सजावटीपर्यंत विविध हंगामी व्यवसाय त्या करतात. स्वतःची व कुटुंबाची प्रगती साधण्यासाठी धडपड करणाऱ्या त्यांच्या जिद्दीला माणदेशीने सतत प्रोत्साहन दिल.
ललगुणसारख्या (ता. खटाव) छोट्याशा गावातील प्रतिभा शिंदे यांनी मोठ्या कष्टाने आणि मेहनतीने आपले स्वतःचे विश्व निर्माण केले. शेती, कुकुटपालन, शेरडी पालन, रसवंतीगृह, गणेशोत्सवातील सजावटीचे साहित्य, नर्सरी असे वेगवेगळे व्यवसाय कल्पकतेने यशस्वी करण्यासाठीची त्यांची धडपड वाखाणण्यासारखी आहे. केवळ आर्थिक स्थिरता मिळवायची एवढेच त्यांच्या मनात नव्हते. ती स्थिरता मिळाल्यानर स्वतःची ओळख निर्माण करून आपल्याबरोबर इतर काही महिलांनाही रोजगार मिळला पाहिजे, अशा जिद्दीतून त्यांनी वाटचाल केली. या प्रवासात माणदेशीकडून हुरूप मिळाल्यामुळे त्यांना ताकद मिळाली. ग्रामीण भागातील महिला जिद्दीने काम करून आपला ठसा उमटवू शकतात, हे त्यांनी सिद्ध केले. खरं तर ललगुण हे त्यांचे आणि त्यांच्या पतीचे आजोळ.
माहेर मूळचे दहिवडीचे व वडील लष्करात होते. त्यांनी साताऱ्यात घर बांधले. भुईंज सासर. लग्नानंतरचा काही काळ त्यांनी मुंबईतही कष्ट उपसले. पण आता ललगुणमध्ये या साऱ्या कष्टाचे चीज झाले आहे. प्रतिभा संजय शिंदे सांगत होत्या, कोकणातून आंब्याची रोपे आणायची, नर्सरी करायची, पावसाळ्यापूर्वी ती रोपे विकायची. गणेशोत्सव आला की सजावटीचे साहित्य तयार करायेच आणि त्याची विक्री करायची.फ त्यांची स्वतःची शेती आहे. त्याशिवाय त्या वाट्यानेही शेती करतात. काही क्षेत्र बागायती आहे. तर काही पावसावर अवलंबून. त्या स्वतः शेतीमध्ये काम करतात. गरज असेल त्यावेळी शेतीच्या कामासाठी इतर महिलांची मदत घेऊन त्यांना रोजगार देतात. त्यामुळे शेती व कुकुटपालन याचे काम बाराही महिने सुरू असते. इतर वेळी हंगामी व्यवसाय करून कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्याचा त्या प्रयत्न करतात. कुकुटपालन करताना त्याव्यवसायाच्या परिस्थितीचा विचार करून पावले टाकतात. त्यांच्याकडे दोन हजार पक्षी होते. परंतु, लॉकडाऊनमध्ये हा व्यवसाय परवडेना झाला. त्यामुळे इतर हंगामी व्यवसायांकडे लक्ष दिले.
तरीही सध्या त्यांच्याकडे सातशे ते आठशे कोंबड्या आहेत. देशी कोंबड्यांना अधिक मागणी असते. त्या घरी पिल्ले तयार करतात. कोंबड्या वाहतुकीसाठी छोटा टेम्पो त्यांनी घेतला आहे. ग्राहकांना माहिती असल्यामुळे लोक घरी येऊन कोंबड्या नेतात. त्यातून कोंबड्या शिल्लक राहिल्या तर टेम्पोतून नेऊन त्यांची विक्री करतात. या व्यवसायामुळे आर्थिक स्थिरता मिळाली. रसवंतीगृहासारखा वेगळा व्यवसाय त्यांनी सुरू केला. गावाचा शुक्रवारचा बाजार तसेच गावाजवळील मंगल कार्यालयामुळे ऊसाच्या रसालाही मागणी असते. गणपतीच्या सजावटीचे साहित्यात प्रामुख्यानेत्या माळा तयार करतात.हे काम त्या यू ट्यूबवरून शिकल्या. त्यासाठी लागणारे साहित्य त्या होलसेलमध्ये खरेदी करतात. गावातील स्टॉल व परिसरात या सजावटीच्या साहित्याची विक्री करतात. पती, दोन मुले, मुलगी असे कुटुंबातील सर्व जण सहकार्य करतात.
मुलीसह मुलांचे शिक्षण सुरू आहे.मोठ्या मुलाने राजस्थानवरून शेरडी आणली. त्याचाही व्यवसाय झाला. शेती व कुकुटपालनाबरोबर असे इतर हंगामी व्यवसायांमुळे आणखी हातभार लागू लागला. या सर्व व्यवसायावेळी माणदेशीने दिलेले प्रोत्साहन मोलाचे ठरले. सुरवातीला रसवंतीगृहासाठी माणदेशीकडून कर्ज घेतले होते. नंतर सर्व व्यवसाय वाढविण्यासाठी वेळोवेळी पाठबळ दिले. हे सारे करताना मोठे कष्ट करावे लागले. सकाळपासून रात्रीपर्यंत उद्योगात व्यस्त राहवे लागते. मेहनत घेतल्याशिवाय काही उभे राहू शकत नाही, हे लक्षात घेऊन अविरतपणे काम सुरू आहे.
याच कष्टातून त्यांनी दोन गुंठे जमीन घेतली आहे. या जागेत कुकुटपालनाच्या व्यवसाय यापुढील काळात वाढविण्यासाठी त्यांनी नियोजन केले आहे. कष्ट आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी जिद्दीने स्वतःची ओळख निर्माण केली. कल्पकतेने वेगवेगळ्या व्यवसायांत यश मिळविले. ग्रामीण भागातील महिला अशा व्यवसायांमधून स्वतः स्वावलंबी होऊन इतर महिलांनाही रोजगार मिळवूनदेण्यासाठी झटत राहतात, असे प्रतिभा शिंदे यांचे काम अनुकरणीय ठरणारे आहे.





