Pratapgad Ghat – महाबळेश्वर ते प्रतापगड रस्त्यावर आंबेनळी घाटात मेटतळे गावच्या हद्दीत काल रात्री बिबट्याने दर्शन दिले. थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या महाबळेश्वरचा संपूर्ण परिसर जंगलांनी व्यापला असून दरवर्षी लाखो पर्यटक येथील निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी येत असतात याच निसर्ग सौंदर्याबरोबर येथील जंगल परिसरात बऱ्याच वन्यजीवांचे अस्तित्व देखील आहे. सह्याद्री पर्वत रांगांचाच एक भाग असल्याने निसर्ग सौंदर्याबरोबरच जैवाविवधतेचा वारसा देखील महाबळेश्वर तालुक्याला लाभला आहे. या भागात रानगवा, सांबर, भेकर, रानकुत्रे, सायाळ असे बऱ्याच प्रकारचे वन्यप्राणी तसेच पक्षी, सरपटणारे प्राणी येथे आढळतात. येथील अन्न साखळीतील वरच्या थरावर असणारा बिबट्या याचे देखील अस्तित्व येथील बऱ्याच भागात त्याने दाखवून दिले आहे. आस पासच्या वातावरणात सहज जुळवून घेत फार पूर्वीपासून बिबट्या या भागात आपले अस्तित्व टिकवून आहे. बऱ्याचदा येथे रस्ता ओलांडताना येशील डोंगर भातात फिरताना स्थानिक तसेच पर्यटकांना देखील त्याचे दर्शन अधून मधून होत असते. गुरुवारी रात्री काही स्थानिक युवकांना महाबळेश्वरहून वाडा कुंभरोशी येथे रात्रीच्या वेळी जात असताना मेटतळे गावाच्या हद्दीत रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या संरक्षक कठड्यावरती निवांत ठाण मांडून बसलेला एक नर जातीच्या पूर्ण वाढ झालेला बिबट्याचे दर्शन झाले. या भागात बिबट्याचे बऱ्याचदा दर्शन होत असते. पिवळ्या अंगावरती काळे ठिपके लांबसडक शेपूट, सुदृढ शरीरयष्टी नर जातीच्या बिबट्याचे वजन साधारणत ६५ ते ८० किलोग्रॅमपर्यंत तर मादीचे वजन ३५ ते ४५ किलोग्रॅमपर्यंत असते तसेच त्याचे आयुर्मान १२ ते १७ वर्ष एवढे असते. अशा सुंदर बिबट्याचे सौंदर्य पाहून युवकांना त्याचा व्हिडिओ तसेच फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. या भागात बिबट्याचे दर्शन म्हणजे एक पर्वणीच असून निसर्गात त्याचे अस्तित्व निसर्ग सौंदर्याचा एक महत्त्वाचा भाग.