Pratapgad Fort: शिवप्रेमींसाठी सर्वात आनंदाची बातमी; प्रतापगडावर आता उभे राहणार ‘हे’ भव्य स्मारक
Pratapgad Fort: मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व पर्यटन मंत्री शंभुराज देसाई यांच्याकडून निधी उपलब्ध करण्याचे आदेश; 'छत्रपती शिवाजी महाराज सृष्टी' प्रकल्पांतर्गत होणार विविध कामे.

Pratapgad Fort – छत्रपती शिवाजी महाराजांचे महापराक्रमी अंगरक्षक, अफजलखान वधाच्या ऐतिहासिक प्रसंगात आपल्या अतुलनीय शौर्याने स्वराज्याचे रक्षण करणारे वीर जिवाजी महाले यांच्या शौर्यगाथेला कायमस्वरूपी अभिवादन करण्याच्या उद्देशाने किल्ले प्रतापगडावर त्यांचा पूर्णाकृती पुतळा व भव्य स्मारक उभारण्यास तत्त्वतः मंजुरी देण्यात आली आहे.
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि पर्यटन मंत्री शंभुराज देसाई यांच्या संयुक्त अध्यक्षतेखाली विधान भवनात झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. स्मारकासाठी निधी उपलब्ध करुन प्रस्ताव तातडीने अंतिम करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहे. बैठकीत किल्ले प्रतापगड परिसरातील पर्यटन विकास, वीर जिवाजी महाले स्मारकाची संकल्पना, निधीची उपलब्धता,
जागेची निश्चिती तसेच प्रशासकीय मान्यतांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. महाराष्ट्राच्या इतिहासातील वीर योद्ध्यांच्या पराक्रमाचे जतन करताना पर्यटनालाही चालना मिळावी, या दृष्टीने संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश दोन्ही मंत्रिमहोदयांनी अधिकाऱ्यांना दिले. बैठकीस पर्यटन संचालनालयाचे संचालक मंगेश जोशी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे सदस्य सचिव विजय पोवार,
पर्यटन विभागाचे उपसचिव संतोष रोकडे तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्हाधिकारी संतोष पाटील, वन विभाग, जलसंपदा विभाग तसेच अन्य संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पर्यटन विभागाच्या ६ फेब्रुवारी २०२३ च्या शासन निर्णयानुसार किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी ‘छत्रपती शिवाजी महाराज सृष्टी’ हा पर्यटन विकास प्रकल्प राबविण्यात येत असून या प्रकल्पासाठी सुमारे 10 कोटी रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
या प्रकल्पामध्ये शिवकालीन इतिहासाचे दर्शन घडविणारे शिल्प, ॲंम्फीथिएटर, लाईट अँड साऊंड शो, पर्यटक सुविधा केंद्र, कॅफेटेरिया, प्रदर्शन दालन, सुशोभिकरण अशा विविध कामांचा समावेश आहे. बैठकीदरम्यान वीर जिवाजी महाले यांच्या स्मारकाबाबत यापूर्वी झालेल्या पत्रव्यवहाराचा आणि प्रस्तावांचा आढावा घेण्यात आला. त्यांच्या ऐतिहासिक योगदानाचे महत्त्व लक्षात घेऊन पूर्णाकृती पुतळा व स्वतंत्र स्मारक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.
स्मारकासाठी आवश्यक जागा निश्चित करुन प्रस्ताव अंतिम करण्याबरोबरच निधी उपलब्ध करून काम तातडीने सुरु करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करून स्मारक उभारणीचे काम लवकरात लवकर सुरू करावे, अशा सूचना दोन्ही मंत्र्यांनी दिल्या.
“छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्मितीत मोलाचे योगदान देणाऱ्या वीर जिवाजी महाले यांच्या शौर्याचा गौरव करणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. प्रतापगडावरील हे स्मारक भावी पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरेल आणि इतिहास जिवंत ठेवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करेल. प्रतापगड हा महाराष्ट्रातील ऐतिहासिक पर्यटनाचा प्रमुख केंद्रबिंदू असून, जिवाजी महाले यांचे स्मारक उभारल्याने पर्यटकांना स्वराज्याच्या इतिहासाची अधिक प्रभावी माहिती मिळेल. यामुळे ऐतिहासिक पर्यटनाला चालना मिळण्याबरोबरच स्थानिक विकासालाही गती मिळेल.”
ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले (सार्वजनिक बांधकाम मंत्री, महाराष्ट्र)






