Pratap Sarnaik : प्रताप सरनाईकांनी सांगितले संजय राऊतांच्या घरी भेट देण्यामागचं कारण; रिपोर्ट शिंदेंना देणार
Pratap Sarnaik : राजकीय चर्चा झाल्याची माहिती

Pratap Sarnaik: शिंदेंच्या शिवसेनेचे नेते मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांच्या कुटुंबियांची भांडूपमधील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी मंत्री सरनाईक यांचे स्वागत खासदार राऊत यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांनी केले. परंतु शिवसेनेच्या फूटीनंतर झालेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
आता या भेटीनंतर मंत्री सरनाईक यांनी माध्यमांशी सावध संवाद साधला ते म्हणाले, “आईचा (राऊत यांच्या आई) अपघात झाला होता. त्यात त्यांना लागलं होतं. राऊत कुटुंबियांमध्ये अशा गोष्टी घडत असतात. प्रताप सरनाईक त्यांच्याच कुटुंबाचा भाग आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मला हक्काने ती लाडू बनवून ठेवते. मी आलो नाही, तर सुनीलला फोन करून विचारायला सांगते, तो का आला नाही?” (Pratap Sarnaik)
या भेटीत राजकीय चर्चा झाल्याचे मंत्री सरनाईक यांनी सांगत ते केवळ एकनाथ शिंदे यांना सांगणार, माध्यमांना सांगणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. “गेले अनेक वर्षे काम करत असताना, त्यांच्याच नेतृत्वाखाली मला मंत्रिपद मिळाले आहे. इकडे येण्यापूर्वी, काही दिवसांपूर्वी मी त्यांना सांगितले होते की, आई पडली आहे, तिला भेटण्यासाठी मी जाणार आहे. मी काही कोणापासून लपवून ठेवत नाही. ज्या काही चर्चा झाल्या, त्यांच्या कानावर नक्कीच घालेल,” असे मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा:
Delhi Pollution: ‘दिल्लीच्या प्रदूषणाचं चित्र अजून बाकीच!’ ; ‘धुराची विहीर’ म्हणत शशी थरूरांचा टोला





