Sanjay Raut : प्रताप सरनाईक संजय राऊतांच्या भेटीला; विलीनीकरणाच्या चर्चांवर स्पष्टच सांगितले…
दिवाळीनिमित्त दोघांची भेट झाल्याची चर्चा

Sanjay Raut : शिंदे गटातील मंत्री प्रताप सरनाईक हे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांच्या भेटीला पोहोचले आहेत. ऐन दिवाळीत या बड्या नेत्यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. शिवसेना फुटल्यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गटात मोठा दुरावा निर्माण झाला आहे. तसेच दोन्ही पक्षातील नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपही सुरू असतात. त्यानंतरही दोन्ही गटाच्या नेत्यांची आज दिवाळीनिमित्त दोघांची भेट झाल्याचे म्हंटले जात आहे.
या भेटीवर संजय राऊत म्हणाले, “दिवाळीचा सण आहे, तर ते येणारच. यामागे कोणतेही संकेत नाहीत. ते येतील लाडू, चकली खातील, त्यांना आवडतात. त्यांची आई आणि माझ्या आईचे फार वर्षांपासून जिव्हाळ्याचे संबंध आहेत. आईचा आशीर्वाद घेऊन निघून जातील. त्यापलीकडे काही नाही. शिवसेना विलीनीकरणाचं काही नाही. शिंदे गटात दोन शिंदे आहेत. तो तुम्ही शोधा,” असे विधानही त्यांनी केले.





