प्रशांत कोरटकरच्या जामिनावर सुनावणी पूर्ण; कोर्टाने निकाल राखून ठेवला

मुंबई : प्रशांत कोरटकरच्या अंतरिम जामिनावर आज कोल्हापूर कोर्टात सुनावणी पार पडली. प्रशांत कोरटकरच्या अंतरिम जामिनाबाबत युक्तीवाद पूर्ण झाला असून कोर्ट यावर उद्या निकाल देणार आहे. इंद्रजित सावंत धमकीप्रकरणी केलेल्या इतर हस्तक्षेप याचिका फेटाळल्या आहेत. प्रशांत कोरटकरने वकिलाच्या माध्यमातून सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. कोरटकरने कोर्टात हजर व्हायचे की, नाही यावर कोर्ट निकाल देणार आहे.
यावर इंद्रजीत सावंत म्हणाले, महाराष्ट्रातील लोकांना आवाहन आहे की, एखाद्या प्रवृत्तीला पाठीमागे सुद्धा घातले जाऊ शकते, याचे उदाहरण आता महाराष्ट्रात चालले आहे. यावर मुख्यमंत्र्यांनी तातडीने निर्णय घ्यावा, कारवाई करावी. हे प्रकरण न्यायालयात असले, तरी आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, की कशा पद्धतीने कारवाई करता येते. आपली संवेदनशीलता महाराष्ट्राने जपली पाहिजे. त्यातल्या त्यात राजकारण्यांनी आणि पोलिस दलाने ती जपली पाहिजे, असेही ते म्हणाले.
दरम्यान, आज सकाळी मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. कोल्हापूर पोलिसांनी कोरटकरच्या जामिनाला विरोध दर्शवला असून हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. सुनावणीपूर्वीच कोरटकर मुंबईत दाखल झाला होता. पण तो कोर्टात हजर झाला नाही, अशी माहिती समोर आली आहे.





