प्रशांत किशोर बिहारमधील पक्षांसाठी ठरणार आव्हान?

पाटणा : बिहारमध्ये पुढील वर्षीच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होईल. त्यासाठी आतापासूनच प्रमुख राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मात्र, त्या पक्षांसाठी निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर एक आव्हान ठरू शकण्याचे संकेत मिळू लागले आहेत. किशोर यांनी जनसुराज अभियान सुरू केले आहे. त्या अभियानाला लवकरच राजकीय पक्षाचे स्वरूप देण्याचे आणि बिहारमधील आगामी निवडणूक लढवण्याचे सूतोवाच त्यांनी याआधीच केले आहे.
त्यानंतर अभियानाशी जोडल्या जाणाऱ्या सदस्यांची संख्या वाढली आहे. त्यामध्ये प्रस्थापित पक्षांच्या कार्यकर्त्यांचाही समावेश आहे. त्यातून आगामी काळात अनेक जण सध्याचे पक्ष सोडून अभियानाचा किंवा किशोर यांच्या नियोजित पक्षाचा भाग बनतील अशी शक्यता बळावली आहे. त्या शक्यतेची गंभीर दखल घेऊन माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्या राजदने याआधीच एक पत्र जारी केले.
त्या पत्रातून पक्षाच्या नेते आणि कार्यकर्त्यांना इशारा देण्यात आला. राजदने किशोर यांच्या अभियानाला भाजपची बी टीम म्हटले. तसेच, त्या अभियानाशी संबंध ठेवणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इरादा जाहीर केला. ती घडामोड ताजी असतानाच मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जेडीयूला एक हादरा बसला. जेडीयूचे प्रदेश सचिव मोहम्मद इरफान यांनी पक्षाला रामराम ठोकून किशोर यांच्या अभियानाची वाट धरली.





