प्रशांत किशोर यांना मोठं बळ; माजी IPS जयप्रकाश सिंह, अभिनेता रितेश पांडे ‘जन सुराज’मध्ये दाखल

पाटणा (बिहार) – आगामी बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशांत किशोर यांच्या नेतृत्वाखालील ‘जन सुराज’ पक्षाचे बळ दिवसेंदिवस वाढत चालले आहे. शुक्रवारी प्रसिद्ध भोजपुरी अभिनेता व गायक रितेश पांडे आणि माजी आयपीएस अधिकारी जयप्रकाश सिंह यांनी जन सुराज पक्षात अधिकृत प्रवेश केला.
पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांच्या उपस्थितीत दोघांनी पक्षाची सदस्यता घेतली. यावेळी किशोर यांनी त्यांचे स्वागत करताना सांगितले की, “जन सुराज अशा व्यक्तींना अग्रक्रम देते, ज्यांनी बिहारमधून बाहेर पडून स्वतःच्या कर्तृत्वावर यश मिळवले आहे. आज पक्षात सामील झालेले दोघंही बिहारचे सुपुत्र असून त्यांनी स्वतःच्या मेहनतीने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.”
माजी आयपीएस जयप्रकाश सिंह यांची राजकारणात एंट्री –
जयप्रकाश सिंह हे हिमाचल प्रदेशात अतिरिक्त पोलिस महासंचालक म्हणून कार्यरत होते. त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेत राजकारणात प्रवेश केला. मूळचे बिहारच्या सारण जिल्ह्यातील रहिवासी असलेले सिंह म्हणाले, “माझे वडील शेतकरी होते. आयपीएस होण्यापूर्वी मी सैन्यात व एअरपोर्ट प्राधिकरणात १२ वर्षे सेवा केली आहे. प्रशांत किशोर यांच्या जन सुराज मोहिमेवर मी सुरुवातीपासून लक्ष ठेवले आहे. हा पक्ष बिहारच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे.”
“नवीन बिहार घडवायचाय” – रितेश पांडे
पक्षप्रवेशानंतर अभिनेता रितेश पांडे यांनी सांगितले की, “मी स्वतः बिहारबाहेर अपमानित झालो आहे, त्यामुळे प्रशांत किशोर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन मी या पक्षात प्रवेश केला आहे. आता आपण सर्वांनी मिळून एक नविन बिहार घडवायचा आहे, जिथे भरपूर रोजगाराच्या संधी असतील.”
प्रशांत किशोर यांच्या नेतृत्वाखाली बिहारमध्ये राजकीय परिवर्तन घडवण्यासाठी ‘जन सुराज’ पक्ष सज्ज झाला असल्याचे या प्रवेशामुळे स्पष्ट झाले आहे.





