बिहार निवडणुकीपूर्वी प्रशांत किशोर सापडले संकटात; दोन राज्यांचे मतदार असल्याचे समोर…

Bihar Assembly Election 2025 | बिहार विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. मात्र मतदानापूर्वी निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्याबाबत एक माहिती समोर आली आहे. निवडणूक आयोगाच्या नोंदीनुसार, प्रशांत किशोर यांचे पश्चिम बंगाल आणि बिहार या दोन्ही राज्यांच्या मतदार यादीत नोंदवले आहे.
इंडियन एक्सप्रेसच्या अहवालानुसार, प्रशांत किशोर यांचे नाव कोलकात्यातील १२१ कालीघाट रोड या पत्त्यावर नोंदवलेले आहे. हाच तो पत्ता आहे जिथे तृणमूल काँग्रेस (टीएमसी) चे मुख्य कार्यालय आहे. हा परिसर बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विधानसभा मतदारसंघ भवानीपूरमध्ये येतो. प्रशांत किशोर यांनी २०२१ च्या बंगाल विधानसभा निवडणुकीत टीएमसीसाठी निवडणूक रणनीतिकार म्हणून काम केले होते. त्यांचे मतदान केंद्र तेथे सेंट हेलेन स्कूल, बी. रानीशंकारी लेन असे नमूद आहे.
दुसरीकडे बिहारमध्ये देखील प्रशांत किशोर यांचं नाव मतदार यादीमध्ये आहे. सासाराम लोकसभा मतदारसंघातील कारगहर विधानसभा मतदारसंघात किशोर यांचं नाव आहे. मध्य विद्यालय, कोनार या मतदान केंद्रावर त्यांचं मतदान होणार आहे. कोरान हे प्रशांत किशोर यांच्या वडिलांचं गाव आहे.
दरम्यान, या वादावर प्रशांत किशोर यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र त्यांच्या एका वरिष्ठ सहकाऱ्याने यासंदर्भात सांगितले की, बंगाल निवडणुकीनंतर प्रशांत किशोर यांनी बिहारमध्ये मतदार ओळखपत्र बनवले होत. यानंतर पश्चिम बंगालमधील मतदार यादीतलं आपलं नाव हटवावं, असा अर्ज देखील किशोर यांनी केला होता. Bihar Assembly Election 2025 |
निवडणुकीबाबतचा नियम काय आहे ?
लोकप्रतिनिधित्व कायदा १९५० च्या कलम १७ नुसार, कोणत्याही व्यक्तीचे नाव एकापेक्षा जास्त मतदारसंघात नोंदवले जाऊ शकत नाही. याशिवाय कलम १८ नुसार, कोणीही एकाच क्षेत्रात दोनदा मतदार म्हणून नोंदणी करू शकत नाही. मतदाराने राहण्याचा पत्ता बदलला तर त्याला फॉर्म ८ भरून जुन्या ठिकाणाहून नाव काढण्याची प्रक्रिया करावी लागते. Bihar Assembly Election 2025 |
दरम्यान, बिहारमध्ये राबवण्यात आलेली SIR मोहीम ३० सप्टेंबर रोजी संपली. या मोहिमेत बिहारमधील अशा प्रकारच्या ६८ लाख ६६ हजार मतदारांच्या नोंदी हटवण्यात आल्या आहेत. यापैकी ७ लाख मतदार असे होते, ज्यांची नावं एकापेक्षा जास्त मतदार याद्यांमध्ये होती, असं निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आलं आहे. येत्या ६ व ११ नोव्हेंबर रोजी बिहारमध्ये मतदान होणार आहे, तर १४ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. Bihar Assembly Election 2025 |
निवडणुकीच्या तोंडावर या वादाने प्रशांत किशोर आणि त्यांच्या जन सुराज पक्षाच्या अडचणी वाढवल्या आहेत. जर हे सिद्ध झाले की त्यांनी जाणीवपूर्वक दोन्ही राज्यांमध्ये नाव नोंदवले, तर निवडणूक आयोग त्यांना अपात्र ठरवू शकते आणि प्रकरण कायदेशीर कारवाईपर्यंत जाऊ शकते. या संपूर्ण प्रकरणावर प्रशांत किशोर आता काय बोलणार? हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा:





