Prashant Kishor : प्रशांत किशोर बनले राजदच्या अस्वस्थतेचे कारण

पाटणा – निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर सध्या राष्ट्रीय जनता दलाच्या (राजद) अस्वस्थतेचे कारण बनले आहेत. किशोर यांच्या जन सुराजशी संबंध न ठेवण्याचे फर्मानच राजदने आपल्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना सोडले आहे.
किशोर यांनी बिहारमध्ये जन सुराज अभियान हाती घेतले आहे. नवी राजकीय व्यवस्था बनवण्याच्या सामूहिक प्रयत्नांचा भाग म्हणून त्या अभियानाचा उल्लेख करण्यात येत आहे. अभियान हाती घेतल्यानंतर किशोर यांनी बिहारमध्ये पदयात्रा काढली. ती चर्चेचा विषय ठरली. काही दिवसांपूर्वी किशोर यांनी लवकरच जन सुराजला राजकीय पक्षाचे स्वरूप देण्याचा मानस व्यक्त केला.
त्यानंतर बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्या नेतृत्वाखालील राजदमधील काही नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी जन सुराजचे सदस्यत्व स्वीकारल्याची माहिती पुढे आली आहे. त्या माहितीची दखल घेऊन राजदचे प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंह यांनी स्वपक्षीयांना उद्देशून एक पत्रक जारी केले.
त्यामध्ये जन सुराजचा उल्लेख भाजपची बी टीम म्हणून करण्यात आला. तसेच, जन सुराजला भाजपकडून अर्थसहाय्य पुरवले जात असल्याचा आरोपही करण्यात आला. पत्रकामधून जन सुराजचे सदस्य बनणाऱ्यांवर कारवाईचा इशारा देण्यात आला.
दरम्यान, जन सुराजने राजदच्या पत्रकाची खिल्ली उडवली. राजद स्वत:ला बिहारमधील सर्वांत मजबूत पक्ष म्हणवतो. मात्र, आमच्या केवळ घोषणेने तो पक्ष घाबरला आहे, असे जन सुराजने म्हटले.





