Prashant Jagtap: प्रशांत जगतापांचा पत्ता कट होणार? हडपसरमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीत जागांवरून जुंपली

प्रभात वृत्तसेवा
पुणे : शरद पवारांची राष्ट्रवादी (राशप) सोडून काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या प्रशांत जगताप यांची उमेदवारी अडचणीत आली आहे. राशपने महाविकास आघाडीतून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्यावर शुक्रवारी झालेल्या जागावाटप बैठकीत २०१७ मध्ये निवडून आलेल्या प्रभाग क्रमांक २५ मधील दोन्ही जागांवर राशपने दावा केला आहे. तसेच या जागांचा निर्णय स्वतः सुप्रिया सुळे घेतील असेही काँग्रेसला सांगण्यात आले.
त्यामुळे जगताप यांच्या उमेदवारीवरून मविआत एकत्र आलेल्या काँग्रेस आणि राशपमध्ये नव्या वादाला तोंड फुटणार आहे.दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यास विरोध करत प्रशांत जगताप यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडत राजीनामा दिला. त्यानंतर , जगताप यांनी दोनच दिवसात थेट मुंबई गाठत काँग्रेसचा हात धरला. जगताप यांनी याची कल्पनाही स्थानिक नेत्यांना दिली नव्हती. त्यामुळेही काँग्रेसमध्येही नाराजी आहे.
हडपसरच्या वानवडीमध्ये काँग्रेसचे प्राबल्य आहे. त्यामुळे त्यांच्या प्रवेशाला विरोध होता. प्रशांत जगताप आणि त्यांची आई रत्नप्रभा जगताय या वानवडी मध्ये ज्या दोन जागांवर निवडून आल्या आहेत, त्याच जागा राष्ट्रवादीच्या असल्याने आमच्याकडेच असेल असे राशपने स्पष्ट केले. या जागांबाबत स्थानिक पातळीवर निर्णय न होता, हा निर्णय पक्षाच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे या घेतील, असे सांगण्यात आले.
काँग्रेस तोडगा काढणार
जगताप यांच्या उमेदवारीबाबत काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. जगताप यांचा राशपसोबत वैयक्तिक वाद नव्हता. त्यामुळे त्यांनी पक्षाच्या विचारधारेला विरोध करत पक्ष सोडला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीनेही त्यांची भूमिका वैयक्तिक न घेता त्यांच्या जागा सोडाव्या, याबाबत चर्चा केली असून याबाबत राशप सकारात्मक असल्याचा दावा शिंदे यांनी केला आहे.





