‘…तर आम्ही सुद्धा सरकार पाडू’ ‘या’ ओबीसी नेत्याने सरकारला दिला इशारा

सांगली : राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंच्या नेतृत्त्वात मराठा आरक्षणाचा लढा दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. मनोज जरांगेंनी सगेसोयरेच्या अध्यादेशाच्या अंमलबजावणीसाठी सरकारवर दबाव आणण्यास सुरूवात केली आहे. तसेच विधानसभा निवडणूकीत 288 उमेदवार पाडू, ठिकठिकाणी मराठा समाजाचे उमेदवार देणार असे जरांगे पाटील म्हणाले. तर दुसरीकडे ओबीसी नेते प्रकाश शेंडगे हे देखील आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
प्रकाश शेंडगेनी दिला राज्य सरकारला इशारा
” मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला बळी पडून वेगळा निर्णय सरकारने घेतल्यास आम्ही महायुतीचे सरकार पाडू, आम्ही सरकारचे आमदार पाडू…आणि आमची सत्ता स्थापन करू” असं प्रकाश शेंडगेंनी म्हटलं आहे. मराठा आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा अंतरवाली सराटीतून उपोषण सुरू केलं आहे.
सांगलीत ओबीसींचा एल्गार मेळावा
ओबीसी आरक्षणासाठी आता रस्त्यावरची लढाई सुरू करीत असल्याचे सांगत प्रकाश शेंडगे यांनी सरकारला इशारा देत 11 ऑगस्ट रोजी सांगलीत ओबीसी समाजाचा आरक्षण बचावसाठी एल्गार मेळावा आयोजित केला असून या मेळाव्यास 1 लाख समाज बांधव सहभागी होतील असे प्रकाश शेंडगे यांनी सांगितले.





