मुंबई : नागपूरमध्ये औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर जाळल्यानंतर मोठा राडा झाला. दोन गट आमने-सामने येत दगडफेक, जाळपोळ करण्यात आली. या हिंसाचारामध्ये अनेक पोलिस जखमी झाले. नागपूर हिंसाचारावरून आता विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीका केली जात आहे.
अशातच आता वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी देखील गंभीर आरोप केला आहे. महाराष्ट्राचा एक विषारी मंत्री उघडपणे समाजात द्वेष पसरवत आहे आणि समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. एवढेच नाही, तर महाराष्ट्रात द्वेष पसरवण्यासाठी बाहेरून लोकांना आणले जात आहे, असा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, महाराष्ट्राचा एक विषारी मंत्री उघडपणे समाजात द्वेष पसरवत आहे आणि समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. एवढेच नाही, तर महाराष्ट्रात द्वेष पसरवण्यासाठी बाहेरून लोकांना आणले जात आहे. हे सर्व एका मोठ्या सुनियोजित कटाचा भाग आहे. नागपूरसह सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की अफवांकडे लक्ष देऊ नका आणि शांतता राखा, असं आव्हान प्रकाश आंबेडकरांनी केले आहे. तसेच सामाजिक सलोखा बिघडवण्याच्या हालचालींमागे असलेल्या शक्तींवर लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे, असेही त्यांनी यावेळी म्हटलं.
औरंगजेब आंदोलनकर्त्याचा कोण लागतो? एकनाथ शिंदे
पोलिसांवर दगडफेक करणे हे दुदैवी आहे. समाजकंटकांना शोधून कडक कारवाई होईल. नागपूर हे शांतता प्रिय शहर आहे. दोन समाजात तेढ निर्माण केली जात आहे. पोलीस मूळाशी जाऊन तपास करतील. आपण सर्वांनी सहकार्य करावे, शांतता राखावी, असे आवाहन एकनाथ शिंदेंनी केले. हा औरंगजेब या आंदोलनकर्त्याचा कोण लागतो. या आंदोलनकर्त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास वाचला पाहिजे, छावा पाहिला पाहिजे. त्याचे समर्थन करणे म्हणजे देशद्रोह्याचे समर्थन करणे आहे. देशाचा द्रोही त्याचे समर्थन म्हणजे देशद्रोहचे समर्थन, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.
नेमकं प्रकरण काय?
राज्यात ‘छावा’ चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर अचानक औरंगजेबाची कबर काढण्यासंदर्भात राज्य सरकारमधील अनेक मंत्र्यांनी वक्तव्ये केली होती. त्यावरुन राजकारण सुरु असताना काल (दि. १७) नागपूरात विश्व हिंदू परिषदेने मोर्चा काढला होता. या मोर्चात औरंगजेबाची प्रतिकात्मक कबरचे प्रतिकात्मक दहन करण्यात आले. त्यानंतर तणाव निर्माण झाला होता.
त्यावेळी पोलिसांनी मध्यस्थी केल्याने हा तणाव निवळला. परंतू सायंकाळी पुन्हा दोन गटात महाल परिसरात दगडफेक सरु करण्यात आली. यावेळी दोन्ही बाजूंनी दगडांचा मारा करण्यात आला. पोलिसांनी यावेळी जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या. यावेळी जमावाने दोन जेसीबी जाळण्यात आल्या. या दगडफेकीत १० ते १५ पोलिसही जखमी झाले आहेत.