“मुख्यमंत्री असताना शरद पवार यांनी दुबईत…” प्रकाश आंबेडकरांचा सर्वात गंभीर आरोप

Prakash Ambedkar on Sharad Pawar राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमुळे मुंबई शहरातील गँगवॉर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. अशातच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांच्या एका परदेश दौऱ्याबाबत गंभीर आरोप केले आहेत.
‘शरद पवार मुख्यमंत्री असताना दुबईमध्ये कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याच्यासोबत त्यांची भेट झाली होती.’ असा गंभीर व खळबळजनक आरोप आंबेडकर यांनी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर केला आहे.
या भेटीला तत्कालीन केंद्र सरकारकडून मान्यता मिळाली होती का, असा प्रश्न देखील आंबेडकरांनी उपस्थित केला आहे. त्यांच्या या आरोपांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
शरद पवारांचा परदेश दौरा आणि दाऊदसोबतची भेट | Prakash Ambedkar on Sharad Pawar
प्रकाश आंबेडकरांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, १९८८ ते १९९१ या काळात शरद पवार मुख्यमंत्री होते. या काळात त्यांनी एक परदेश दौरा केला होता, ज्यात त्यांनी लंडन, कॅलिफोर्निया आणि दुबईला भेट दिली होती.
“शरद पवार लंडनमधून कॅलिफोर्नियाला गेले, तिथे त्यांनी एक बैठक घेतली. या बैठकीचं स्वरूप काय होतं, हे समोर यायला हवं. त्यानंतर ते पुन्हा लंडनला परतले आणि दुबईला गेले, जिथे त्यांची दाऊद इब्राहिमसोबत भेट झाली होती.”
“या भेटीत दाऊदने पवारांना सोन्याचा हार दिला होता. या दौऱ्याची तत्कालीन केंद्र सरकारने परवानगी दिली होती का?” असा थेट प्रश्न आंबेडकरांनी उपस्थित केला.
केंद्र सरकारकडून खुलासा होणे आवश्यक | Prakash Ambedkar on Sharad Pawar
प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारांच्या या दौऱ्याबाबत जुने रेकॉर्ड बाहेर काढण्याची मागणी केली आहे. त्यांनी सांगितलं की, “मुख्यमंत्री असताना परदेशात दौरे करण्यासाठी केंद्र सरकारची परवानगी आवश्यक असते. केंद्र सरकारने या दौऱ्याला परवानगी दिली होती का, आणि दिली असल्यास त्या बैठकीचा आणि दाऊदसोबतच्या भेटीचा रिपोर्ट केंद्र सरकारकडे दिला गेला होता का, याचा खुलासा होणं गरजेचं आहे.”
इस्त्रायल-पॅलेस्टाईन वाद आणि भारताची भूमिका
आंबेडकरांनी पत्रकार परिषदेत जागतिक राजकारणावरही भाष्य केलं. त्यांनी म्हटलं की, “सध्या जगभरात इस्त्रायल आणि पॅलेस्टाईन वाद सुरू आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारची भूमिका आतून इस्त्रायलसोबत, तर बाहेरून पॅलेस्टाईनसोबत दिसत आहे. या परिस्थितीत भारतातील मुस्लीम समुदायाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. अशा काळात पारदर्शकता राखणं गरजेचं आहे.”
मुंबईत पुन्हा गँगवॉर सुरू? | Prakash Ambedkar on Sharad Pawar
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर मुंबईत गँगवॉर पुन्हा सुरू झालं आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रकाश आंबेडकरांनी या संदर्भातही इशारा दिला की, “पुन्हा एकदा कॉन्ट्रॅक्ट किलिंग आणि गोळीबारीचे प्रकार महाराष्ट्रात सुरू झाले आहेत. ही परिस्थिती १९९० आणि २००० च्या दशकासारखी वाटते.” त्यांनी म्हटलं की, “मुंबई, महाराष्ट्र सध्या हॉटसीटवर आहेत, आणि कॅनडा, यूएस आणि भारतातील वादामुळे हे प्रकरण आणखी ताणलं जातंय. त्यामुळे १९९० च्या दशकातल्या परिस्थितीचा फेरआढावा घेणं आवश्यक आहे.”
आंबेडकरांच्या या आरोपांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला असून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून या आरोपांवर काय प्रतिक्रिया देण्यात येते, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हे देखील वाचा…
काॅंग्रेसचे नाना पटोले – ठाकरे गटात उडाले ‘खटके’; महायुतीला होणार फायदा?





