Prakash Ambedkar : महाराष्ट्रात निवडणुकीची वेळ संपल्यानंतर 76 लाख मतदान; प्रकाश आंबेडकरांचा आरोप

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यानंतर आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही गतवर्षीच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतांची हेराफेरी झाल्याचा आरोप केला आहे. विधानसभा निवडणुकीची वेळ संपल्यानंतरही महाराष्ट्रात सुमारे 76 लाख मतदान झाले. पण राहुल गांधींपासून शरद पवारांपर्यंत कोणत्याही नेत्यात या प्रकरणी कोर्टात जाऊन रेकॉर्ड मागण्याची हिंमत नाही, असे ते म्हणालेत.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नुकताच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत हेराफेरी झाल्याचा आरोप केला होता. महाराष्ट्र निवडणुकीत मॅच फिक्सिंग झाले असून, भविष्यात बिहार विधानसभा निवडणुकीतही त्याचा पुनरुच्चार होईल, असे ते म्हणाले होते. त्यांच्या या आरोपामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ माजली होती. त्यानंतर निवडणूक आयोगासह भाजपनेही त्यांचे आरोप धुडकावून लावले होते.
त्यानंतर आता प्रकाश आंबेडकर यांनीही या निवडणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल गतवर्षी 23 नोव्हेंबर रोजी जाहीर झाला होता. त्यात महायुतीला सर्वाधिक 230 जागा मिळाल्या होत्या. त्यात भाजपला सर्वाधिक 132, शिवसेना (शिंदे गट) 57 व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) 46 जागा मिळाल्या होत्या.





