प्रजनेश गुणेश्वरन पराभूत ; डेव्हिस कपमध्ये भारताची खराब सुरुवात

लंडन – भारताचा अनुभवी टेनिसपटू प्रजनेश गुणेश्वरनला डेव्हिस कप वर्ल्ड ग्रुप वन सामन्यात फिनलंडविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. यामुळे डेव्हिस कप स्पर्धेत भारताची सुरुवात निराशाजनक ठरली. जागतिक क्रमवारीत 165व्या क्रमांकावर असलेल्या प्रजनेशला ओट्टो विर्तानेनकडून 3-6, 6-7 ने पराभव पत्करावा लागला.
या सामन्यात प्रजनेशला विजयाचे दावेदार मानले जात होते, पण पहिला सेट 3-6ने जिंकून विर्तानेनने सामन्यावर पकड मिळविली. मात्र दुसऱ्या सेटमध्ये प्रजनेशने पुनरागमन केले आणि सामना टायब्रेकरपर्यंत पोहोचला. हा सामना विर्तानेनने एक तास 25 मिनिटांत जिंकला.
भारताच्या दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू रामकुमारचा सामना फिनलंड नंबर वन एमिल रुसुवुओरीशी होईल, जो जागतिक क्रमवारीत 74व्या क्रमांकावर आहे. दुहेरीत बोपण्णा आणि दिविज शरण यांना हेनरी आणि हॅरीविरुद्ध सर्वोत्तम खेळावे लागेल. बोपण्णा आणि शरण यांनी मार्च 2019 मध्ये इंग्लंडविरुद्ध एकमेव सामना खेळला होता. बोपण्णा आतापर्यंत पेस किंवा साकेत मायनेनीसोबत खेळलेला आहे.
नॉर्वेची उझबेकिस्तानवर आघाडी
डेव्हिस कपमध्ये नॉर्वेच्या कॅस्पर रुडने अव्वल 10 खेळाडूंमध्ये स्थान पटकाविले आहे. त्याने सुल्तानोव याच्यावर 6-3, 6-3 असा विजय मिळवित ही कामगिरी केली आहे. या विजयासह नॉर्वेने उझबेकिस्तानवर 2-0 अशी आघाडी मिळविली आहे. तसेच 1995नंतर नॉर्वे प्रथमच वर्ल्ड ग्रुप प्लेऑफमध्ये दाखल झाला आहे.





