Prajakta Mali – बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथे महाशिवरात्रीनिमित्त बुधवारी प्राजक्ता माळीचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार होता. परंतु, ऐनवेळी या कार्यक्रमात सहभागी न होण्याचा निर्णय प्राजक्ता माळीने घेतला. कार्यक्रमाला विरोध होत असल्याने अनावश्यक प्रसिद्धी मिळाली. त्यामुळे प्रशासनावर ताण नको म्हणून आपण हा निर्णय घेतल्याचे प्राजक्ताने सांगितले. त्यामुळे त्र्यंबकेश्वर येथे प्राजक्ता माळी ऐवजी तिच्या इतर सहकारी कलाकारांकडून हा कार्यक्रम सादर केला जाणार आहे. प्राजक्ता माळीच्या कार्यक्रमाला देवस्थानच्या माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी विरोध दर्शवला होता. यासंदर्भात त्यांनी देवस्थानला पत्र लिहून चुकीचा पायंडा न पाडण्याचे आवाहन केले होते. त्यावर प्राजक्ता माळीने काल एका व्हिडिओद्वारे देवाच्या दारात कोणी सेलिब्रिटी नाही. सगळे भक्त असतात. त्यामुळे समाजाची दिशाभूल करु नये, असे म्हणज उत्तर दिले होते. प्राजक्ता माळीच्या या व्हिडिओनंतर त्र्यंबकेश्वरमधील कार्यक्रम होणार असल्याचे देवस्थानचे विश्वस्त मनोज थेट यांनी सांगितले होते. मात्र, प्राजक्ताने आज इन्स्टाग्रामवर रील शेअर करत आपण कार्यक्रमाला येणार नसल्याचे म्हटले आहे. काय म्हणाली प्राजक्ता माळी? मला पहिल्यापासूनच या कार्यक्रमाला फार प्रसिद्धी द्यायची नव्हती. कारण मंदिराच्या प्रांगणात किती गर्दी होईल आणि किती जण हा कार्यक्रम पाहू शकतील, असे सगळे प्रश्न होते. त्यामुळे मी सोशल मीडियावरदेखील या कार्यक्रमाची अजिबात माहिती दिली नव्हती, असे प्राजक्ता म्हणाली. परंतु काल दिवसभरात या कार्यक्रमाला अनावश्यक प्रसिद्धी मिळाली आणि त्यामुळे आता अवास्तव गर्दीची भीती आणि काळजी प्रशासनाच्या मनात आहे. त्यामुळे मी माझ्या कुटुंबीयांशी बोलून हा निर्णय घेत असल्याचे तिने सांगितले.