Prajakta Mali: आधी मांसाहार सोडला, आता दूधही बंद! प्राजक्ता माळीने स्वीकारली व्हिगन जीवनशैली; सांगितलं खास कारण
Prajakta Mali प्राजक्ता माळी पूर्वी मांसाहार करायची. मात्र, काही काळानंतर तिने पूर्णपणे मांसाहार सोडण्याचा निर्णय घेतला. एका मुलाखतीत तिने यामागचं कारण सांगितलं होतं. मांसाहार करणाऱ्या लोकांच्या विरोधात आपण नसल्याचंही तिने स्पष्ट केलं होतं.

Prajakta Mali: मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी तिच्या अभिनयासोबतच फिटनेस आणि आरोग्याबाबतच्या जागरूकतेसाठीही ओळखली जाते. तिच्या कामासोबतच वैयक्तिक आयुष्य, आहार आणि जीवनशैली याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. काही काळापूर्वी प्राजक्ताने एका मुलाखतीत तिच्या आहारातील बदलांविषयी खुलासा केला होता. पूर्वी मांसाहार करणाऱ्या प्राजक्ताने अचानक नॉनव्हेज खाणं का सोडलं? तसेच आता तिने व्हिगन जीवनशैली स्वीकारण्याचा निर्णय का घेतला? याबद्दल तिने स्वतः माहिती दिली होती.
‘मांसाहार करणाऱ्यांच्या विरोधात नाही, पण…’
प्राजक्ता माळी पूर्वी मांसाहार करायची. मात्र, काही काळानंतर तिने पूर्णपणे मांसाहार सोडण्याचा निर्णय घेतला. एका मुलाखतीत तिने यामागचं कारण सांगितलं होतं. मांसाहार करणाऱ्या लोकांच्या विरोधात आपण नसल्याचंही तिने स्पष्ट केलं होतं.
यावेळी प्राजक्ता म्हणाली होती की, माणसांची आणि प्राण्यांची पचनसंस्था वेगवेगळी असते. मांसाहार पचवण्यासाठी मानवी शरीराला साधारण ७२ तास लागतात, असं तिचं मत आहे. यासंदर्भात काही माहितीपटही उपलब्ध असल्याचं तिने सांगितलं होतं. या गोष्टींचा विचार केल्यानंतर आपण मांसाहार सोडल्याचं तिने स्पष्ट केलं. त्यामुळे पूर्वी आवडीने नॉनव्हेज खाणारी प्राजक्ता आता पूर्णपणे शाकाहारी झाली आहे.
ताज्या आणि घरगुती अन्नाला प्राधान्य
प्राजक्ता केवळ मांसाहार टाळत नाही, तर रोजच्या आहारात कोणते पदार्थ असावेत, याकडेही विशेष लक्ष देते. शिळं अन्न आणि पॅकेज्ड फूड खाणं शक्यतो टाळावं, असं तिचं मत आहे. आपण जे अन्न खातो त्याचा परिणाम आपल्या शरीरावर आणि चेहऱ्यावरही दिसून येतो, असं ती सांगते.
त्यामुळे शक्य तितकं ताजं आणि घरगुती अन्न खाण्यावर तिचा भर असतो. चांगला आहार आणि योग्य दिनचर्या या दोन्ही गोष्टी आरोग्यासाठी महत्त्वाच्या असल्याचं प्राजक्ता मानते. आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींचा विचारपूर्वक निर्णय घेणं गरजेचं असल्याचंही तिच्या बोलण्यातून दिसून येतं.

Prajakta Mali
जेवणामध्ये दोन तासांचं अंतर ठेवण्याचा सल्ला
एका मुलाखतीत प्राजक्ताने जेवणाच्या वेळांबाबतही काही गोष्टी सांगितल्या होत्या. कोणताही पदार्थ खाल्ल्यानंतर पुढील दोन तास काहीही खाऊ नये, असं ती सांगते. मात्र, या काळात पाणी पिण्यास हरकत नसल्याचंही तिने स्पष्ट केलं होतं.
एखाद्या लग्नसमारंभात किंवा कार्यक्रमात नेहमीपेक्षा जास्त जेवण झाल्यास दुसऱ्या दिवशी ती लंघन करते. त्यावेळी दिवसभर केवळ फळं खाण्याचा पर्याय निवडत असल्याचं तिने सांगितलं होतं. फरसाणसारखे पदार्थही ती खाते; मात्र रोजच्या आहारात अशा पदार्थांचा समावेश करत नसल्याचं तिने स्पष्ट केलं होतं.
आरोग्याच्या कारणामुळे स्वीकारली व्हिगन जीवनशैली
यावर्षी ऑगस्ट महिन्यात प्राजक्ताने तिच्या आहाराबाबत आणखी एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केला. तिने व्हिगन जीवनशैली स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, हा निर्णय केवळ आवड म्हणून घेतलेला नसून त्यामागे आरोग्याचं कारण असल्याचं तिने सांगितलं.
दूध आणि दुग्धजन्य पदार्थ शरीराला सहन होत नसल्यामुळे तिला सतत खोकल्याचा त्रास होत होता. त्यामुळे दूध आणि त्यापासून तयार होणारे पदार्थ आहारातून वगळण्याचा निर्णय तिने घेतला. यानंतर तिने व्हिगन जीवनशैली स्वीकारण्याचं ठरवलं. सिद्धिविनायक आणि आई तळजाई मातेचं दर्शन घेतल्यानंतर प्राजक्ताने सोशल मीडियावर ही माहिती चाहत्यांसोबत शेअर केली होती.
एकूणच, प्राजक्ता माळीने गेल्या काही काळात आपल्या आहारात अनेक बदल केले आहेत. मांसाहार सोडण्यापासून ते व्हिगन जीवनशैली स्वीकारण्यापर्यंतचा तिचा हा प्रवास सध्या चर्चेत आहे. मात्र, प्रत्येकाची प्रकृती आणि शरीराच्या गरजा वेगळ्या असतात. त्यामुळे आहारात मोठे बदल करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे.





