Tata Open Maharashtra 2022 | प्रज्ञेश, अर्जुनला वाईल्ड कार्ड

पुणे – भारताच्या प्रज्ञेश गुणेश्वरन आणि अर्जुन कढे यांना शनिवारी टाटा ओपन महाराष्ट्र-2022 स्पर्धेसाठी पुरुष एकेरीच वाईल्ड कार्ड प्रवेश देण्यात आला. यापूर्वी भारताच्या युकी भांब्री आणि रामकुमार रामनाथन यांना वाईल्ड कार्ड प्रवेश देण्यात आला आहे. यामुळे आता या स्पर्धेच्या मुख्य फेरीत चार भारतीय टेनिसपटू खेळणार आहेत.
ही स्पर्धा म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील टेनिस कोर्टवर दि. 31 जानेवारी ते 8 फेब्रुवारी यादरम्यान पार पडणार आहे. अर्जुन हा पुण्याचाच खेळाडू असून, त्याने 2020मध्ये पहिले राष्ट्रीय विजेतेपद मिळविले होते. प्रजनेश हा 2018 आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदकविजेता खेळाडू आहे. दक्षिण पूर्व आशियातील या एकमेव एटीपी 250 मालिकेतील पूर्वीच्या तीन स्पर्धेत तो खेळला आहे.
या स्पर्धेत जागतिक स्तरावरील अव्वल खेळाडूंचा सहभाग आहे. यामध्ये 15व्या स्थानावरील अस्लन कारात्सेव, गतविजेता जिरी वेसेली आणि माजी युवा ऑलिम्पिक विजेता कामिल मॅजच्राझेक यांच्यासह या आठवड्यात स्पर्धेच्या चौथ्या आवृत्तीचा खेळ रंगणार आहे. गेल्या स्पर्धेत प्रज्ञेशने उप-उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती. त्याचवेळी 28वर्षीय अर्जुनला विजेत्या वेसेलीकडून पराभव पत्करावा लागला होता.





