Praful Patel : …हे 2014 मध्येच ठरले होते; युती-आघाडीबाबत प्रफुल्ल पटेल यांचा गौप्यस्फोट

गोंदिया : भाजपसोबत येण्याची खूप आधीपासून आमची आणि मोठ्या साहेबांची (शरद पवार) देखील इच्छा होती. मात्र, गाडी स्लीप होऊन जात होती. 2014 च्या निवडणुकीत आम्ही काँग्रेसचा हात सोडायचा आणि भाजपने शिवसेनेचा हात सोडायचा असे ठरले होते, असा मोठा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केला.
गोंदियात महायुतीच्या वतीने आयोजित सत्कार समारोप कार्यक्रमांमध्ये ते बोलत होते. यावेळी प्रफुल पटेल यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना देताना कानमंत्र देखील दिला.
प्रफुल पटेल म्हणाले, 2014 च्या निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी मी स्वतः बाहेरुन पाठिंबा देत असल्याची घोषणा केली होती. आमच्या सहकार्याने हरिभाऊ बागडे स्पीकर म्हणून निवडून आले. मात्र, पुन्हा गडबड झाली आणि आम्ही मागे राहून गेलो, तुम्ही पुढे निघून गेले असे म्हणत मंचावर बसलेल्या भाजप आमदारांना देखील पटेल यांनी टोला लगावला.





