सुवर्णमंदिरात योगासने करणे पडले महागात; फॅशन डिझाईनर ‘अर्चना मकवाना’ यांना जीवे मारण्याची धमकी

Golden Temple | Archana Makwana | Yoga – शिख धर्मीयांचे प्रमुख तीर्थक्षेत्र असलेल्या अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात योगासने केल्याने फॅशन डिझायनर अर्चना मकवाना अडचणीत आल्या आहेत. त्यांना सतत जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. अशा परिस्थितीत आता वडोदरा पोलिसांनी मकवाना यांना सुरक्षा पुरवली आहे.
पंजाब पोलिसांनी रविवारी अर्चना मकवाना विरोधात गुन्हा दाखल केला होता. त्याच्यावर शीखांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप आहे. शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीने मकवाना यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. अर्चना यांच्या कृतीमुळे गुरुद्वाराच्या पावित्र्याचा भंग झाल्याचे प्रबंधक समितीचे म्हणणे आहे.
फॅशन डिझाईन आणि सोशल मीडियावरील प्रभावशाली व्यक्ती अर्चना मकवाना यांनी २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सुवर्ण मंदिरात ‘शिर्षासन’ केले. त्याचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले होते, जे व्हायरल झाले होते. हे फोटो व्हायरल होताच मकवाना यांना प्रचंड टीकेला सामोरे जावे लागले. यासोबतच जीवे मारण्याच्या धमक्याही आल्या आहेत.
हे प्रकरण गंभीर बनत वाढत असल्याचे पाहून मकवाना यांनी आपल्या कृत्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. अर्चना यांनी सोशल मीडियावरून फोटो काढून टाकले आहेत. आपल्या कृत्याबद्दल पश्चाताप व्यक्त करत त्यांनी एका व्हिडिओमध्ये माफी मागितली आहे. योगाचे आभार मानण्यासाठी मी योगदिनी शिर्षासन केले.
कोणाच्याही भावना दुखावण्यासाठी मी शिर्षासन केलेले नाही. माझा तसा काही हेतू नव्हता. धार्मिक भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. मी माफी मागते. मला चुकीच्या मार्गाने नेले आहे. मला जीवे मारण्याच्या धमक्या आणि शिवीगाळ करण्यात आली आहे. तरिही विविध ठिकाणांहून त्यांना धमक्या मिळतच आहेत.





