#प्रभात_व्हॉट्सअॅप_रिपोर्टर : समस्या तुमची, व्यासपीठ आमचे

पिंपरी-चिंचवड शहर वेगाने विस्तारत आहे. वाढते नागरीकरण, लोकसंख्या वाढ आणि तुलनेत कमी पडणाऱ्या सुविधा अशी परिस्थिती सध्या पाहण्यास मिळत आहे. नागरिकांना किमान मूलभूत नागरी सुविधा मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागतो आहे. रस्ते, पाणी, आरोग्य, वीज आदी विषयांशी संबंधित छोटे-छोटे प्रश्न सुटावेत, अशीच सर्वसामान्यांची माफक अपेक्षा आहे. या समस्या मांडण्यासाठी आम्ही आपल्याला व्यासपीठ उपलब्ध करून देत आहोत.
रस्ते खोदल्याने गैरसोय
पिंपरी – पिंपरीगाव आणि परिसरात विविध ठिकाणी रस्ते खोदून ठेवल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. नवमहाराष्ट्र महाविद्यालय ते अशोक थिएटर दरम्यान असलेल्या रस्त्यावर सांडपाणी नलिकेच्या कामासाठी खोदकाम करण्यात आले आहे. त्यामुळे रस्त्यावर मातीचा ढिगारा पडलेला आहे. पर्यायाने, येथील वाहतूक वळविण्यात आली आहे. वाहनचालकांना येथून लांबचा वळसा घेऊन प्रवास करावा लागत आहे. पिंपरीगाव ते जयहिंद हायस्कूलच्या रस्त्यावर देखील ठिकठिकाणी खोदकाम केले आहे. त्यामुळे नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. विविध ठिकाणी केलेल्या खोदकामांमुळे काळेवाडी, पिंपरी कॅम्पात जाण्यासाठी वाहनचालकांना अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे. काही ठिकाणी खोदकाम केल्यानंतर रस्ता पुन्हा पूर्ववत केलेला नाही. त्यामुळे खडकाळ रस्त्यानेच नागरिकांना प्रवास करावा लागत आहे.
दुभाजकासाठी ठेवलेल्या सिमेंटच्या ब्लॉकमुळे अपघाताचा धोका
पिंपरीगाव – पिंपळे निलख येथील रक्षक सोसायटी चौक ते औंध-रावेत मार्गावर भारत इलेक्ट्रॉनिक्स गृह संकुलासमोर रस्ता दुभाजकासाठी प्रशासनाने सिमेंटचे ब्लॉक ठेवले आहेत. हे ब्लॉक व्यवस्थित लावण्यात आले नाहीत. त्यामुळे वाहनचालकांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. एखादे वाहन भरधाव वेगात आले आणि त्याचा धक्का जर सिमेंटच्या ब्लॉकला बसला तर त्याला अपघात होईल, परंतु दुसऱ्या लाइनमधून प्रवास करणाऱ्या वाहनचालकालादेखील अपघात होऊ शकतो, त्यामुळे वाहतूक नियंत्रण करण्यासाठी उभारण्यात आलेले हे सिमेंटचे ब्लॉक अपघातास निमंत्रण देऊ शकतात, याची प्रशासनाने दखल घेऊन त्वरित हे ब्लॉक येथून हाटवावेत, अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून होत आहे.
– बी. एन. राजे
रस्त्याच्या खोदकामामुळे नागरिक त्रस्त
पुनावळे -कोयते वस्ती रोड, बालाजी मंदिराजवळ विकासकामासाठी खोदकाम केले आहे. विकासकाम पूर्ण झाले परंतु त्यासाठी रस्ता खोदून ठेवला आहे तो मागील एक महिन्यापासून अद्याप दुरुस्त केला नाही. त्यामुळे रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांना, ज्येष्ठांना तसेच वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रात्रीच्या वेळेस वाहनचालकांच्या पुढे चर आहे हे लक्षात आले नाही, तर गाडी आदळते. त्यामुळे वाहनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. तसेच वाहनचालकांना शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने याची दखल घेऊन रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
लोखंडी बाकड्यांच्या पट्टयांची होतेयं चोरी
पिंपरीगाव – येथील काटे पिंपळे मार्गावरील पदपथावर नागरिकांना बसण्यासाठी लोखंडी बाकडे ठेवण्यात आले आहेत. परंतु शहरातील चोरांनी आता या बाकड्यांच्या पट्ट्या चोरण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांची गैरसोय होत आहे. सकाळी, सायंकाळी या मार्गावर फिरावयास येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. नदी किनारी व झाडी असल्याने अनेक ज्येष्ठ नागरिक या पदपथावर बसावयास येत असतात. मात्र, चोरट्याकडून सर्रास येथील बाकड्याच्या लोखंडी पट्ट्या गायब केल्या जात असल्याने बाकड्यांची दुरवस्था झाली आहे.
महापालिका प्रशासन याकडे लक्ष देताना दिसत नाही. तसेच गस्तीवर असणारे पोलिसांना देखील असे चोरटे दिसत नाहीत. त्यामुळे सार्वजनिक संपत्तीचे नुकसान होत असून नागरिकांना गैरसोयचा सामना करावा लागत आहे. सहज पट्ट्या काढून घेता येत असल्याने नित्कृष्ट दर्जाची बाकडी बसवून जनतेच्या कररुपी पैशांचीच चोरी प्रशासनाकडून होत असल्याची चर्चा येथे फिरावयास येणारे नागरिक करीत आहेत. यावर कायमस्वरुपी उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
– एस. एन. कुंभार





