46 वर्षांपूर्वीचा प्रभात : ता. 28, माहे जुलै, सन 1977

पुण्यात बांधकामांचा उच्चांक!
पुणे, दि. 27 – पुणे शहरात बांधकामांनी उच्चांक प्रस्थापित केला आहे. गेल्या वर्षभरातील आकडेवारीचे मानाने सीलिंग कायदा लागू झाल्यानंतर गेल्या 6 महिन्यांत बांधकामात 48 टक्के वाढ झाली आहे. सीलिंग कायद्याने मोकळ्या जमिनीसाठी दिलेली मुदत संपण्यास अवघा एक महिन्याचा कालावधी राहिला आहे. परंतु त्याहीपेक्षा आणीबाणीत 15 रुपये पोते या दराने उपलब्ध असणारे सिमेंट आता येत्या महिन्याभरात 22 रुपये दराने मिळणेही अशक्य होणार आहे. सरकारी दराने 19 रुपये पोतेप्रमाणे दर सुरू असून काळा बाजारात भाव 25 रुपयांपर्यंत गेला आहे.
बिहारचे राज्यपाल छोट्या घरात राहणार
पाटणा – बिहारचे राज्यपाल जगन्नाथ कौशल यांनी राजभवनऐवजी दुसऱ्या छोट्या बंगल्यात राहावयाचा निर्णय घेतला आहे. रांची येथील राजभवनाचा वापर आता केंद्राने परवानगी दिल्यास सरकारी कचेऱ्यांसाठी केला जाणार आहे. ज्या सरकारी कचेऱ्या खासगी जागांत आहे त्यांच्या भाड्यापोटी कित्येक लाख रुपये द्यावे लागतात.
नांबिया, झिम्बाब्वे प्रश्न सुटावेत
नैरोबी – नांबिया आणि झिम्बाब्वे यांचे प्रश्न शांततापूर्ण मार्गाने सुटावेत, असे भारताला वाटत आहे. वंशवादी सत्ताधाऱ्यांनी समझोत्याचा मार्ग न चोखाळल्यास सशस्र लढ्याशिवाय मार्गच राहणार नाही, असे अटल बिहारी वाजपेयी म्हणाले.





