Prabhas : दाक्षिणात्य अभिनेता प्रभासच्या हॉरर-फँन्टसी ‘द राजा साब‘ चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकताच चित्रपटाच्या निमित्ताने हैदराबाद इथे आयोजित कार्यक्रमात अभिनेता प्रभासने बॅालिवूड अभिनेता संजय दत्तचे तोंडभरून कौतुक केले. या कार्यक्रमाला बॅालिवूड अभिनेत्री निधी अग्रवाल देखील उपस्थित होती. हैदराबादमध्ये झालेल्या चित्रपटाच्या प्री-रिलीज कार्यक्रमात सुपरस्टार प्रभास चित्रपटाविषयी बोलत असताना त्याने संजय दत्तचे कौतुक केले. या कार्यक्रमात प्रभासने खुलासा केला की, चित्रपटाच्या डबिंगच्या वेळी संजय दत्तचे सीन्स पाहताना तो स्वतःला विसरला होता. प्रभासच्या मते संजय दत्तची पडद्यावरची उपस्थिती इतकी प्रभावी आहे की जेव्हा कॅमेरा त्याच्यावर लक्ष केंद्रित करतो तेव्हा बाकी सर्व काही मागे पडते. तो म्हणाला की, संजय दत्त जवळच्या शॉट्समध्ये पडद्यावर पूर्णपणे आपले वर्चस्व गाजवतो, अशा शब्दांत त्याने संजय दत्तचे कौतुक केले. ‘द राजा साब’ चित्रपटाच्या ट्रेलरने आधीच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे. या चित्रपटात प्रभास आणि संजय दत्त यांच्या व्यतिरिक्त बोमन इराणी, मालविका मोहनन, निधी अग्रवाल आणि रिद्धी कुमार या कलाकारांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटाच्या ट्रेलरवरून स्पष्ट होते की, प्रत्येक कलाकार त्याच्या व्यक्तिरेखेत एक वेगळा रंग भरताना दिसतो, ज्यामुळे चित्रपटाचा कॅनव्हास आणखी मोठा बनला आहे. ‘द राजा साब’ हा चित्रपट मारुती यांनी दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट हिंदी, तेलुगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित होणार आहे. नवीन वर्ष जानेवारी २०२६ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. चित्रपट चांगली कमाई करेल असा विश्वास समीक्षकांनी व्यक्त केला आहे. प्रभास आणि संजय दत्त पहिल्यांदाच या चित्रपटाच्या निमित्ताने एकमेकांसोबत स्क्रिन शेअर करताना पाहायला मिळणार आहेत. हा चित्रपट मोठ्या स्केलवर तयार करण्यात आला असल्याने चित्रपटाचे बजेटही मोठे आहे. हेही वाचा : सर्वोच्च न्यायालयाकडून कुलदीप सेंगरला मोठा झटका ; दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती