प्रभात वृत्तसेवा तळेगाव ढमढेरे – येथील श्रीदत्त तरूण मंडळ (गुरवमळा) आणि समस्त ग्रामस्थ यांच्या वतीने दत्त जयंतीनिमित्त दत्त महाराजांच्या पालखीची भव्य मिरवणूक उत्साहात काढण्यात आली. गावातील महिला, पुरूष तसेच लहान थोर भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत उत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मिरवणुकीची सुरुवात ग्रामपंचायत कार्यालयापासून झाली आणि बाजारपेठ मार्गे जात बाजार मैदान येथे समारोप करण्यात आला. टाळ-मृदंगाच्या गजरात भाविकांनी दत्तमय वातावरण निर्माण केले. लहान बालकांचे वारकरी वेशातील वादन आणि खेळ हे पालखी सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले. गुरवमळा येथे पहाटेपासून अभिषेक, सत्यनारायण महापूजा, दत्तजन्मोत्सव, महाआरती, कीर्तन आणि महाप्रसाद आदी धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडले. सायंकाळी ४ वाजता ह.भ.प. समाधान महाराज शर्मा यांचे ‘दत्त जन्म’ विषयावर कीर्तन झाले.कार्यक्रमास माजी उपसरपंच गणेश तोडकर, राहुल भुजबळ, सामाजिक कार्यकर्ते रमेश भुजबळ, युवा उद्योजक स्वप्नील खेडे, सुदामराव भुजबळ, अर्जुन तोडकर, अनिल भुजबळ, आदित्य साबळे, राजेंद्र तोडकर, श्रीकांत भुजबळ, सचिन तोडकर, संजय भुजबळ, रामचंद्र भुजबळ, कालिदास तोडकर, सोमनाथ भुजबळ, अभिषेक शेवते आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच साळुमाळी वस्ती, कमेवाडी, शिंदेवस्ती, गुरवमळा येथील मोठ्या प्रमाणात महिला सहभागी झाल्या.