प्रभासचा ‘Kalki 2898 AD’ अडकला वादाच्या भोवऱ्यात; आचार्य प्रमोद कृष्णम यांनी निर्मात्यांना बजावली कायदेशीर नोटीस

Acharya Pramod | Kalki 2898 AD : अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता प्रभास यांचा सिनेमा ‘कल्कि 2898 एडी’ सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. सिनेमाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धमाका केल्याचे दिसून आले आहे. याशिवाय प्रेक्षकांची सिनेमाला उत्तम दादही मिळत आहे. अमिताभ बच्चन आणि कमल हसन यांच्यासह तगडी स्टार कास्ट असणारा सिनेमा सुपरहिट ठरत आहे. भारतीय पौराणिक कथांवर आधारित एक सायन्स फिक्शन सिनेमा आहे.
दरम्यान, आता या सिनेमावर भाजप नेते आणि श्री कल्की धामचे पीठाधीश्वर आचार्य प्रमोद कृष्णम यांनी आक्षेप व्यक्त केला आहे. चित्रपटातील धार्मिक तथ्ये आणि धार्मिक पुस्तकांशी छेडछाड केल्याचा आरोप करत त्यांनी निर्मात्यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. त्यांनी निर्मात्यांना चुकीचे चित्रण थांबवण्याचे आवाहनही केले आहे. सध्या सगळीकडे सुपरहिट ठरलेला हा चित्रपट आता वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आचार्य प्रमोद कृष्णम नेमकं काय म्हणाले –
आचार्य प्रमोद कृष्णम म्हणतात की, “सनातन संस्कृतीशी खेळण्याची कोणालाही परवानगी नाही. संभलच्या कल्की धामची पायाभरणी झाली. 19 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः गर्भगृहाची पायाभरणी केली. चित्रपटात भगवान श्री कल्कीचा अवतार ज्या पद्धतीने दाखवला जात आहे त्यामुळे मन दुखावले आहे. पुराणातील संदेशाचा विपर्यास करण्याचा प्रयत्न केला जात आहे.’ असं ते म्हणाले.
सनातन “संस्कृति”
और “शास्त्रों” से “खिलवाड़” नहीं किया जा सकता. https://t.co/sFfACoYxeB— Acharya Pramod (@AcharyaPramodk) July 20, 2024
शास्त्रानुसार भगवान कल्की हा श्री विष्णूचा दहावा अवतार आहे. हा चित्रपट त्याच्याशी संबंधित आहे. आचार्य प्रमोद यांनी ‘कल्की’च्या निर्मात्यांवर आरोप केला असून निर्मात्यांनी भगवान कल्कीची संकल्पनाच बदलून टाकल्याचे म्हटले आहे.
चित्रपटात देवाचे चित्रण चुकीच्या पद्धतीने करण्यात आले असून, अर्धवट तथ्ये आणि धार्मिक ग्रंथांशी छेडछाड करून हा चित्रपट बनवण्यात आला आहे. याचा राग आचार्य यांना आहे. या चित्रपटामुळे कट्टरतावादी हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्याचेही ते म्हणाले आहेत.
दरम्यान, ‘कल्कि 2898 एडी’ हा सिनेमा हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषेत प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटात प्रभाससोबत अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण, कमल हासन आणि दिशा पटानी मुख्य भूमिकेत झळकले आहेत.





