Hockey India : पी.आर. श्रीजेशच्या निवृत्तीनंतर हॉकी इंडियाचे मोठे पाऊल, 16 क्रमांकाची जर्सी…

Hockey India Retires PR Sreejesh 16 Number Jersey : – माजी भारतीय गोलरक्षक पीआर श्रीजेशच्या सन्मानार्थ, हॉकी इंडियाने त्याची जर्सी क्रमांक 16 निवृत्त केली आहे. यासोबतच त्याची ज्युनियर संघाच्या नवीन प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. हॉकी इंडियाने बुधवारी ही माहिती दिली.
पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाने कांस्यपदक जिंकले. भारताच्या या यशात गोलरक्षक श्रीजेशने महत्त्वाची भूमिका बजावली. या ऑलिम्पिक खेळांनंतर त्याने हॉकीमधून निवृत्ती घेतली. कांस्यपदकाच्या सामन्यात त्याने स्पेनविरुद्ध शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. हॉकी इंडियाचे सरचिटणीस भोला नाथ सिंग यांनी सांगितले की, यापुढे संघातील कोणत्याही वरिष्ठ खेळाडूला 16 क्रमांकाची जर्सी दिली जाणार नाही, जरी ती कनिष्ठ स्तरावर सुरू राहील.
𝙄𝙘𝙤𝙣𝙞𝙘 𝙅𝙚𝙧𝙨𝙚𝙮 𝙣𝙤 16 𝙬𝙞𝙡𝙡 𝙣𝙤𝙬 𝙛𝙤𝙧𝙚𝙫𝙚𝙧 𝙗𝙚 𝙖 𝙥𝙖𝙧𝙩 𝙤𝙛 𝙄𝙣𝙙𝙞𝙖𝙣 𝙃𝙤𝙘𝙠𝙚𝙮 𝙛𝙤𝙡𝙠𝙡𝙤𝙧𝙚. https://t.co/tSmEVgyDMv
— Hockey India (@TheHockeyIndia) August 14, 2024
आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळणारा श्रीजेश स्पेनविरुद्धच्या संपूर्ण सामन्यात गोलपोस्टसमोर भिंतीसारखा उभा राहिला. त्याने एकच गोल स्वीकारला, तोही पेनल्टी स्ट्रोकवर. शेवटच्या 15 मिनिटांत स्पेनला 5 पेनल्टी मिळाल्या, पण स्पॅनिश ड्रॅग फ्लिकरला गोल करता आला नाही.
भारतासाठी 336 सामने खेळले
अनेक राष्ट्रकुल खेळ, आशियाई खेळ आणि विश्वकरंडक खेळलेल्या श्रीजेशने भारतासाठी 336 सामने खेळले असून हे त्याचे चौथे ऑलिम्पिक होते. याआधी श्रीजेशने आपल्या उत्कृष्ट गोलकीपिंगच्या जोरावर 2021 मध्ये झालेल्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला कांस्यपदक मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. तेव्हा भारताचा या खेळातील 41 वर्षांचा पदकांचा दुष्काळ संपला. श्रीजेशने 2012 च्या ऑलिम्पिकमध्ये पदार्पण केले होते.





