मुंबई – मुंबईतील अनेक भागांत रविवारी सकाळी अचानक वीजपुरवठा खंडित झाला होता. काही मार्गावरील लोकल ट्रेन सेवाही त्यामुळे ठप्प झाली होती. सुमारे तासभर वीज गायब होती. त्यानंतर हा पुरवठा टप्प्याटप्प्याने पुर्ववत करण्यात आला. दक्षिण आणि मध्य मुंबईत ही समस्या अधिक प्रमाणात होती. पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट आणि अंधेरी स्थानकादरम्यान सकाळी सुमारे तासभर लोकल गाड्या जागेवरच खोळंबून राहिल्या होत्या. या भागाला वीज पुरवठा करणाऱ्या टाटा पॉवर कंपनीकडूनच वीज पुरवठ्यात व्यत्यय आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तथापि त्यांनी तातडीने हा पुरवठा सुरळीत केल्यानंतर सकाळी 10 वाजून 53 मिनीटांनी लोकल सेवा पुर्ववत झाली. मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा देखील काहीं काळ थांबली होती.छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसलाही वीजपुरवठा खंडित झाला होता. या संबंधात बेस्ट कंपनीच्यावतीने सांगण्यात आले की, मुलुंड ते ट्रॉम्बे पर्यंत 220 केव्हीची ट्रान्समिशन लाईन ट्रिप झाली होती. त्यातून या व्यत्ययाची व्याप्ती वाढली. दरम्यान टाटा कंपनीने राज्य वीज पारेषण कंपनीची कळवा ते ट्रॉम्बे लाईन ट्रिप झाल्याने आमच्या वीज पुरवठ्यात अडथळे आले होते असे म्हटले आहे. टाटा कंपनीचे सर्व वीज प्रकल्प सुरळीत सुरू असल्याची माहितीही टाटा पॉवरच्या वतीने देण्यात आली आहे. मुंबईत लोडशेडिंग केले जात नाही. या शहराला विनाव्यत्य वीज पुरवठा सतत सुरू असतो.