नेपाळमध्ये सत्ता बदल; केपी शर्मा ओली यांनी नवीन सरकार स्थापन करण्याचा केला दावा

Nepal News| नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड हे संसदेत विश्वासदर्शक ठराव हरले आहेत. यानंतर पुष्प कमल दहल प्रचंड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. १९ महिन्यांनतर त्यांना पंतप्रधानपदावरून पायउतार व्हावे लागले आहे.
माजी पंतप्रधान के. पी. शर्मा यांच्या नेतृत्वाखालील सीएपीएन-यूएमएल पक्षाने प्रचंड यांच्या सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता. त्यानंतर शुक्रवारी दुपारी नेपाळच्या संसदेत विश्वासमत चाचणी घेण्यात आली. ज्यात नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल ‘प्रचंड’ संसदेत विश्वासदर्शक ठराव जिंकण्यात अपयशी ठरले.
नवीन सरकार स्थापन करण्याचा दावा
या घडामोडींनंतर माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. सीपीएन-यूएमएलचे अध्यक्ष ओली यांनी शुक्रवारी राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांच्याकडे 165 खासदारांच्या पाठिंब्याने नवीन सरकार स्थापन करण्याचा दावा मांडला.
UML Chair Oli claims PM post after President Paudel calls for staking claim https://t.co/ScDMJBDe5W
— Online Radio Nepal (@radio_nepal) July 13, 2024
या खासदारांमध्ये त्यांच्या पक्षाचे 77 आणि नेपाळी काँग्रेसचे 88 खासदार आहेत. यापूर्वी, देशाच्या 275 सदस्यीय प्रतिनिधीगृहात मतांच्या विभाजनादरम्यान, 69 वर्षीय प्रचंड यांना 63 मते मिळाली होती, तर विश्वासदर्शक ठरावाच्या विरोधात 194 मते पडली होती. विश्वासदर्शक ठरावासाठी किमान 138 मतांची गरज होती. प्रतिनिधी सभेच्या 258 सदस्यांनी मतदानात भाग घेतला, तर एक सदस्य गैरहजर राहिला.
नेपाळ कम्युनिस्ट पार्टी-माओईस्ट सेंटर (CPN-MC) चे अध्यक्ष प्रचंड यांनी 25 डिसेंबर 2022 रोजी पदभार स्वीकारल्यानंतर चार वेळा विश्वासदर्शक ठराव जिंकण्यात यश मिळविले होते, परंतु यावेळी ते अपयशी ठरले. यामुळे नेपाळी काँग्रेस आणि सीपीएन-यूएमएल यांना नवीन आघाडी सरकार स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला.
पंतप्रधान पदासाठी कसा ठरला फॉर्म्युला ?
माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या नेतृत्वाखालील सीपीएन-यूएमएलने गेल्या आठवड्यात सभागृहातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या नेपाळी काँग्रेससोबत सत्ता वाटप करारावर स्वाक्षरी केल्यानंतर प्रचंड यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा पाठिंबा काढून घेतला. नेपाळी काँग्रेसचे अध्यक्ष शेर बहादूर देउबा यांनी आधीच पुढील पंतप्रधान म्हणून ओली यांना पाठिंबा दिला आहे.
देउबा आणि ओली यांनी प्रचंड यांच्या नेतृत्वाखालील सरकार पाडण्यासाठी आणि नवीन आघाडी सरकार स्थापन करण्यासाठी सात कलमी करारावर स्वाक्षरी केली होती. करारानुसार, ओली आणि देउबा प्रतिनिधीगृहाच्या उर्वरित कार्यकाळात रोटेशनद्वारे पंतप्रधानपदाची वाटणी करतील. पहिल्या टप्प्यात दीड वर्षांसाठी ओली पंतप्रधान होतील आणि त्यानंतर उर्वरित कालावधीसाठी देउबा पंतप्रधान असतील.
पाच वेळा विश्वासदर्शक ठरावाचा सामना करावा लागला
गेल्या 16 वर्षांच्या लोकशाहीच्या या अल्प कालावधीत नेपाळने 13 पंतप्रधानांचा कार्यकाळ पाहिला. 2006 पासून प्रचंड हे तिसऱ्यांदा नेपाळचे पंतप्रधान बनले होते. याआधी प्रचंड हे 2008 ते 2009 आणि 2016 ते 2017 पर्यंत नेपाळचे पंतप्रधान होते. डिसेंबर 2022 मध्ये पुन्हा एकदा पंतप्रधान झाल्यानंतर प्रचंड यांनी पाच वेळा संसदेत विश्वासदर्शक ठरावाचा सामना केला आहे. यावेळी त्यांना सभागृहात बहुमत सिद्ध करता आले नाही.
हेही वाचा:
बोगस डॉक्टरचा पर्दाफाश; डॉक्टर म्हणून मागील पाच वर्षे प्रॅक्टीस करणारा व्यक्ती फक्त ‘दहावी पास’





