बोगस डॉक्टरचा पर्दाफाश; डॉक्टर म्हणून मागील पाच वर्षे प्रॅक्टीस करणारा व्यक्ती फक्त ‘दहावी पास’

पुणे – लोणीकाळभोर येथील एका बोगस डॉक्टरचा पर्दाफाश करण्यात आला आहे. हा डॉक्टर म्हणून मागील पाच वर्षे प्रॅक्टीस करणारा हा व्यक्ती फक्त दहावी पास आहे. इतकेच नव्हे तर त्याच्या क्लिनिकला रुग्ण ॲडमिट करण्यासाठी एक बेडही आहे. त्यांच्या क्लिनिकमध्ये त्याने मागील पाच वर्षात हजारो रुग्णांवर उपचार केले आहेत.
प्रकाश रंगनाथ तोरणे (६३,रा. कदमवाकवस्ती, मुळ श्रीरामपुर, अहमदनगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या बोगस डॉक्टरचे नाव आहे. त्याच्याविरुध्द महापालिकेच्या अधिकारी डॉ. रुपाली रघुनाथ भंगाळे (३८,रा. काळेपडळ, हडपसर) यांनी तक्रार दिली आहे. तोरणे याचे जनसेवा नावाने कदमवाकवस्ती येथे क्लिनिक होते. सध्या वातावरणातील बदलामुळे शहरात विविध आजारांची साथ असल्याने त्याच्या क्लिनिकमध्येही रुग्णांच्या रांगा लागत होत्या.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार एक जागृक नागरिकाने महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची प्रकाश तोरणे याच्याकडे कोणतीही वैद्यकीय पदवी नसल्याची खबर दिली होती. त्यानूसार महापालिकेच्या आरोग्य विभागाचे एक पथक त्याच्या क्लिनिकवर गेले . तेव्हा त्यांना तेथे जनसेवा क्लिनिकचा बोर्ड दिसला. मात्र तोरणे याच्या नावापुढे कोणतीही डिग्री नमुद केली नव्हती. त्यामुळे त्यांना संशय आल्याने, त्यानी अधिक तपासणी केली. तेव्हा महाराष्ट्र कौंन्सिल ऑफ मेडिसिन यांच्याकडेही त्याची नोंदनी नसल्याचे आढळले. इतकेच नव्हेत तर त्याच्याकडे कोणतीच पदवीही नाही. तो फक्त दहावी पास आहे. यामुळे पथकालाही धक्का बसला. दहावी पास असतानाही तो सर्व आजारावर सराईतपणे औषधपाणी करत होता. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक पवार करत आहेत.
प्रकाश तोरणे याने अनेक वर्षे एका डॉक्टरकडे कंपाऊंडरचे काम केले आहे. यामुळे त्याला औषधांची नावे, सलाईन लावणे , इंजेक्शन देणे या गोष्टी माहित आहेत. त्याच्या क्लिनिकमध्येही मोठ्या प्रमाणात औषधे, इंजेक्शन आणि सलाईत आढळून आले. तो गंभीर रुग्णांवर क्लिनिकमध्येच सलाईन लावून उपचार करत होता.यासाठी त्याने क्लिनिकमध्ये एक बेडही लावला होता. मागील पाच वर्षे तो बिनदिक्क्तपणे प्रॅक्टीस करत होता. अनेक रुग्णतर चांगला गुण येतो म्हणून त्याची शिफारसही करत होते.





