Postman Nostalgia: डिजिटल युगात हरवला पत्रांचा दूत! एका क्लिकने संवाद, मात्र पोस्टमनच्या पावलांतील आपुलकी हरवली
Postman Nostalgia: मोबाईल आणि सोशल मीडियाच्या वेगात संवादाचे स्वरूप बदलले; हस्ताक्षरातील भावना आणि पत्रांमधील ऊब झाली दुर्मीळ.

– अतूल चोपडे पाटील
Postman Nostalgia – एक काळ असा होता की गावातील एखाद्या रस्त्यावर खाकी गणवेशातील पोस्टमन दिसला की अनेकांच्या नजरा त्याच्याकडे वळत असत. कुणी नोकरीच्या पत्राची वाट पाहत असे, कुणी मुलाच्या पत्राची, तर कुणी माहेरहून येणाऱ्या खुशालीची. पोस्टमनच्या सायकलीची घंटी म्हणजे अनेक घरांसाठी आशेचा, आनंदाचा आणि कधी कधी अश्रूंचाही आवाज असायचा. त्या घंटीमध्ये नात्यांची ऊब होती, प्रतीक्षेचे समाधान होते आणि शब्दांमधून जपलेलं प्रेम होतं.
आज काळ बदलला आहे. मोबाईल, इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या युगात संवादाचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे. एका क्षणात संदेश जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात पोहोचतो. व्हिडिओ कॉलवर चेहरा दिसतो. ई-मेल काही सेकंदांत पाठवता येतो. व्हॉट्सॲपवर शुभेच्छांचा वर्षाव होतो. पण या वेगवान तंत्रज्ञानाच्या प्रवाहात पत्रांचा दूत असलेला पोस्टमन मात्र हळूहळू हरवत चालला आहे.
एकेकाळी पत्र लिहिणे ही एक भावना होती. प्रत्येक शब्द विचारपूर्वक लिहिला जायचा. कागदावर उमटलेले अक्षर म्हणजे त्या व्यक्तीचा स्पर्श वाटायचा. पत्रात कधी गुलाबाची पाकळी असायची, कधी राखी, कधी शुभेच्छापत्र, तर कधी आईने मुलासाठी लिहिलेले चार प्रेमाचे शब्द. ते पत्र अनेकदा वाचले जायचे. जपून ठेवले जायचे. वर्षानुवर्षे आठवणींचा खजिना म्हणून सांभाळले जायचे.
ग्रामीण भागात होते पोस्टमनचे वेगळे स्थान
पोस्टमन फक्त पत्र पोहोचवणारा कर्मचारी नव्हता. तो अनेक कुटुंबांचा सदस्यच बनला होता. गावातील प्रत्येक घर त्याला माहीत असायचे. कुणाच्या घरी मुलगा परदेशात आहे, कुणाच्या मुलीचे लग्न झाले आहे, कोण सैन्यात आहे, याची त्याला माहिती असायची. निरक्षर लोकांसाठी तो पत्र वाचून दाखवायचा. उत्तरही लिहून द्यायचा.
आनंदाची बातमी सांगताना त्याच्या चेहऱ्यावर हसू असायचे आणि दुःखाची बातमी देताना त्याचेही डोळे पाणावायचे. विशेषतः ग्रामीण भागात पोस्टमनचे स्थान वेगळेच होते. सैन्यातील जवानांचे पत्र घरी पोहोचले की घरात आनंदाचे वातावरण निर्माण व्हायचे. तर कधी दुःखद बातमी घेऊन आलेल्या पोस्टमनलाही अश्रू अनावर व्हायचे.
हस्तलिखित पत्र होताहेत दुर्मीळ
भारतीय टपाल विभागाने काळानुसार स्वतःमध्ये अनेक बदल केले आहेत. स्पीड पोस्ट, पार्सल सेवा, बँकिंग सुविधा, विमा सेवा, आधारसंबंधित सेवा अशा विविध माध्यमांतून पोस्ट कार्यालय आजही नागरिकांची सेवा करत आहे. ऑनलाइन खरेदी वाढल्यामुळे पार्सल वितरणात पोस्टमनची भूमिका अजूनही महत्त्वाची आहे. मात्र त्याच्या हातातील पत्रांचे प्रमाण निश्चितच मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे.
डिजिटल क्रांतीने अनेक सुविधा दिल्या, हे नाकारता येणार नाही. वेळ वाचला, अंतर कमी झाले, संवाद अधिक वेगवान झाला. परंतु या बदलामध्ये काही अमूल्य गोष्टी नकळत मागे राहिल्या. हस्ताक्षरातील भावना, कागदाचा सुगंध, पत्र उघडताना होणारी उत्सुकता आणि पोस्टमनच्या चेहऱ्यावरचे आपुलकीचे हास्य याला कोणतेही तंत्रज्ञान पर्याय ठरू शकले नाही.


